मुंबई: भारतात क्रिकेट प्रेमींची कमी नाही. संपूर्ण देशात प्रचंड संख्येत क्रिकेट चाहतेदेखील आहेत. पण जेवढं खेळाडू या खेळाला प्रसिद्ध करतात तेवढं समालोचन आणि समालोचकांचं देखील योगदान आहे. याच गोष्टीचा विचार करून आणि भारतीय जनतेचा कौल बघून 2013 या वर्षी हिंदी समालोचन स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर सुरु करण्यात आले. मग स्टार स्पोर्ट्स हिंदी ही वाहिनीदेखील सुरु करण्यात आली. या नंतर कन्नड, मल्याळम, तामिळ, बांग्ला भाषेत समालोचन सुरु करण्यात आले.
ओटीटी आल्यांनतर हे सर्व पर्याय हॉटस्टारवर समाविष्ट करण्यात आले. पण, यात मराठीचा समावेश मात्र केला नाही. याच मुद्द्याला मध्यनजर ठेवत मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते हॉटस्टारच्या कार्यालयात पोहचले. त्यांनी हॉटस्टारच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रश्न केला की समालोचन मराठीतून का होत नाही ? या संबंधित मनसेने मराठी भाषामंत्री उदय सामंत यांचीदेखील चर्चा केली. या गोष्टीची मागणी अनेकदा केल्यानंतर पण चांगला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मनसे कार्यकर्ते थेट हॉटस्टारच्या कार्यालयात जाऊन ठेपले.
या भेटीनंतर डिस्नी हॉटस्टारच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटस्टारवर समालोचन मराठीत लवकरच सुरु होईल याची हमीदेखील दिली.
यावेळी बोलताना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले "आम्ही भेटायला नाही तर धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रात मराठी भाषा लागावी यासाठी आंदोलन होत असेल तर या सारखी कोणती शोकांतिकेची गोष्ट नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आम्हाला भांडावं लागतं ? इथे आल्यानंतर हॉटस्टारवाले मराठी माणसाला पुढे करतात. म्हणजे दोन मराठी माणसांनी भांडण करायचं ? "आम्ही ह्यांना क्लिअर सांगितलं की, जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही, हॉटस्टारमध्ये आम्ही सामन्यांचं मराठीत समालोचन करु, असं लेखी आश्वासन घेऊनच जाऊ. यानंतर आम्हाला हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने दिलेलं पत्र आहे. आम्ही आता त्यांना सेटअप करण्यासाठी वेळ देतोय. पण आता लवकरच आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरु होणार आहे. तेव्हापासून हॉटस्टारवर मराठी भाषेत समालोचन होणार, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मी मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की, आपण देखील मॅच बघताना मराठी भाषेचा वापर करावा"