दुभाजकावरील लाखो रुपयांनी लावलेली झाडे रातोरात तोडली, नागपूरकरांमध्ये संताप
नागपूर : शहरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने रस्त्याच्या दुभाजकावर लावण्यात आलेली जवळपास 600 झाडे अज्ञात व्यक्तीने तोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार त्रिमूर्ती नगर चौक ते खामला चौक या 3 ते 4 किमी अंतरावर घडला असून, तोडलेल्या झाडांमध्ये 450 अशोकाची आणि 150 पामच्या झाडांचा समावेश आहे.
ही सर्व झाडे चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लावण्यात आली होती. यातील अशोकाच्या झाडांची उंची 15 ते 20 फूट तर पामच्या झाडांची उंची 10 ते 15 फूट इतकी झाली होती. झाडांची देखभाल आणि खरेदीवर लाखो रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग ही झाडे कोणी तोडली याबाबत अनभिज्ञ आहे. मनपाच्या उद्यान विभागानेही वृक्षतोडीस कोणतीही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे ही वृक्षतोड नेमकी कोणी केली आणि का केली, याचा शोध सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतापनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. वृक्षतोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा प्रकार दिवसा ढवळ्या घडला असून, परिसरात कोणीही संशयित हालचाल केली असल्यास त्याचा शोध घेतला जात आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दुभाजकावर मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यास आग्रही आहेत. त्यांच्या घरापासून काही अंतरावरच ही झाडे तोडल्यामुळे नागपूरकर आश्चर्य व्यक्त करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी सांगितले की, "ही घटना अत्यंत गंभीर असून, आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहोत. लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल." सामाजिक कार्यकर्ते निलेश नगोलकर यांनी या वृक्षतोडीविरोधात आवाज उठवत जबाबदारांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
👉👉 हे देखील वाचा : राज्य सरकारकडून एअर इंडिया इमारतीचा घेतला ताबा