रायगड : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन सुरू असलेल्या वादामुळे जिल्ह्याचा पुढील आर्थिक वर्षाचा विकास आराखडा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकलेली नाही. परिणामी, 6 फेब्रुवारीच्या नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगडला वगळण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे. शिवसेनेने विरोध केल्यामुळे अदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. यामुळे अद्याप जिल्ह्याचा पालकमंत्री निश्चित झालेला नाही. या परिस्थितीचा थेट परिणाम जिल्ह्याच्या विकासकामांवर होण्याची शक्यता आहे.
👉👉 हे देखील वाचा : विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात नारळ फोडण्यास बंदी; कारण काय?
सामान्यतः जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक होत असते. यामध्ये जिल्ह्याचा वार्षिक विकास आराखडा ठरवला जातो. मात्र, पालकमंत्रीच नसल्याने बैठकच आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे रायगडचा समावेश नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतही झाला नाही.
राजकीय साठमारीमुळे जिल्ह्यातील विकासकामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निधी मंजुरीसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते, परंतु जिल्हा नियोजन आराखड्याशिवाय पुढील वाटचाल कठीण होणार आहे. लवकरच पालकमंत्र्यांचा निर्णय होण्याची गरज असल्याचे स्थानिक विकास संस्थांनी आपले मत स्पष्ट केले आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.