मुंबई: रायगडावरील शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या भाषणावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. कार्यक्रमाच्या वेळी शहांनी वारंवार ‘शिवाजी, शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख सन्मानाने ‘महाराज’ म्हणून व्हायला हवा होता, पण देशाच्या गृहमंत्र्यांनी तोही भान हरपल्याप्रमाणे विसरला, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, 'शहा सातत्याने एकेरी उल्लेख करत होते, हे अपमानास्पद आहे. ज्यांना छत्रपतींच्या कार्याची आणि इतिहासाची जाणीव नाही, तेच आज ज्ञान देण्याचा प्रयत्न करतायत, हे दुर्दैवी आहे.' तसेच औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख समाधी म्हणून केल्यावर राऊतांनी संताप व्यक्त केला. 'तुम्ही औरंगजेबाच्या थडग्याला समाधी म्हणता आणि छत्रपतींना अरे तुरे करता, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे', असे म्हणत त्यांनी फडणवीसांनाही प्रश्न विचारले की, 'तुमचं नकली हिंदुत्व हेच का?'
राऊतांनी पुढे म्हटले की, छत्रपतींवर ‘ज्ञान’ देण्याचा अधिकार शहांसारख्या लोकांना नाही. 'ज्यांनी महाराष्ट्रावर सुडाने कारवाया केल्या, ते आज शिवरायांचा जयजयकार करणाऱ्यांमध्ये बसतात, हे हास्यास्पद आहे.' शिवरायांचे विचार, त्यांचे ध्येय, याची जाणीव आम्हाला आहे, असे सांगताना त्यांनी छत्रपतींचे वंशज, मंचावर बसलेले इतर नेते यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. 'तुमच्या डोळ्यांसमोर शिवरायांचा अवमान झाला, तरी तुम्ही मूक राहिला, हे लाजिरवाणं आहे.'
मुख्यमंत्री फडणवीसांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कायदा करण्याची घोषणा काल केली होती. याच विधानाचा आधार घेत राऊतांनी आव्हान दिले की, 'मग आता अमित शहांवर कारवाई करा. हिंमत असेल तर गृहमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून दाखवा.' शिवरायांविषयीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला असून, राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.