परभणी: काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंदोलन सुरु होते. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्जे करण्यात आला होता. यात अनेक आंदोलक जखमी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होत. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी याचाही समावेश होता मात्र न्यायालयीन कोठडीत असतांना सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आलीय. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाल्याचं समोर आलंय. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर हा ठपका ठेवण्यात आलाय.
याबाबत अधिक माहिती अशी की, दलित संघटनांनी 11 डिसेंबर 2024 रोजी राज्यघटनेच्या प्रतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये आंदोलन केलं होतं.जाळपोळ व तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली. त्यात सोमनाथ यांचाही समावेश होता. परंतु न्यायालयीन कोठडीत असतांना सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाल्याचं समोर आलंय. याप्रकरणी अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्यात त्यातच जितेंद्र आव्हाडांनी याप्रकरणी भावनिक पोस्ट केलीय.
हेही वाचा: एसी (AC) चे वीज बिल कमी करायचे असल्यास वापरा 'हा' उपाय
काय आहे पोस्ट?
एक होतकरू आणि तरुण मुलगा परिस्थितीशी झगडत कायदयाचे शिक्षण घेत, पीडितांना न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पाहत असतो. त्याला अन्याय सहन होत नसतो, त्याविरोधातील उद्रेकात तो सामील होतो. पोलीस अटक करतात आणि न्यायालयात हजर करतात. न्यायालयीन कोठडी मिळते आणि त्याच दिवशी त्याचा तुरुंगात मृत्यू होतो. तो तरुण म्हणजे परभणीची सोमनाथ सूर्यवंशी...
सरकार छाती ठोकपणे म्हणते सोमनाथचा मृत्यू मल्टिपल शॉकमुळे झाला. मला आधीपासून ह्यात संशय होता हे जवळपास अशक्य होते. पोस्टमार्टममध्ये सर्व क्लिअर होते, तरीही सरकार ऐकत नव्हते. कुणालातरी वाचवत होते. आज दंडाधिकारी अहवालात हे स्पष्ट झाले की हा मृत्यू नव्हता तर ती हत्या होती, क्रूर हत्या. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात तैनात पोलिसांना दोष दिला आहे.
सोमनाथचा मृत्यू हा एक इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. मी मनापासून सलाम करतो सोमनाथच्या आईला. जिने स्वाभिमानाने सरकारकडून दिली जाणारी तुटपुंजी मदत नाकारली. तिने स्पष्टपणे सांगितले मला माझा सोमनाथ हवा. मी दुःखद अंत:करणाने सांगतोय, सोमनाथ तर मी आणू शकत नाही, ती ताकद भगवंताने मला दिली नाही. पण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावेल हा जितेंद्र आव्हाडचा आईला शब्द आहे.