जळगाव: जळगाव जिल्ह्यासाठी 90 हजार 188 घरकुलांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून आतापर्यंत 86 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 71 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. शहरी घरकुल योजना जवळपास 99 टक्के पूर्ण झाली असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी घरकुल योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला.
शहरी घरकुल 99 टक्के पूर्ण, ग्रामीण घरकुलांना गती
शहरी घरकुल योजना जवळपास 99 टक्के पूर्ण झाली असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. आतापर्यंत 86 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 71 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.
हेही वाचा : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला अटकेत; प्रकरणात नवा ट्विस्ट
27 मार्चपासून घरकुल सुरू करण्यासाठी विशेष अभियान
पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनी त्वरित घरकुल बांधकाम सुरू करावे यासाठी 27 मार्चपासून विशेष अभियान हाती घेतले जाणार आहे. या मोहिमेत प्रशासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून अधिकाधिक घरकुले सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.
रमाई आणि शबरी आवास योजनांनाही गती
राज्य पुरस्कृत रमाई आणि शबरी आवास योजनांना मंजुरी देण्यात आली असून मंजूर घरकुलेही या अभियानात सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. आता थांबायचं नाही, घरकुलांचं स्वप्न पूर्ण करायचं असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही वचन दिलं होतं, घरकुलांचं स्वप्न पूर्ण करणार! हे फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरलं पाहिजे. 27 तारखेपासून अभियान राबवायचं, लाभार्थ्यांनी काम सुरू करायचं आणि आपलं घर पूर्णत्वास न्यायचं. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधितांनी यात पूर्ण ताकदीने सहभागी व्हावं! हे घरकुल अभियान म्हणजे केवळ योजना नव्हे, तर लाखो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे पाऊल आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घरकुल बांधकामास तातडीने सुरुवात करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.