रूंदे-टिटवाळा रस्त्यावर टँकर पलटी; अपूर्ण रस्त्यामुळे अपघात, चालक गंभीर जखमी

कल्याण तालुक्यात रूंदे-टिटवाळा मार्गावर टँकर उलटून चालक जखमी. धोकादायक वळण व अपूर्ण रस्त्यामुळे अपघात; रस्त्याचे काम थांबल्याने वाहतूक व नागरिक हैराण.

रूंदे-टिटवाळा रस्त्यावर टँकर पलटी; अपूर्ण रस्त्यामुळे अपघात, चालक गंभीर जखमी

कल्याण: कल्याण तालुक्यातील रूंदे-टिटवाळा मार्गावर सोमवारी सकाळी एक धक्कादायक अपघात घडला. फळेगावला येथून काळू नदीवरून पाणी भरून स्वप्न नगरी, मनाचा पाडा येथे जाणाऱ्या टँकरने रस्त्यावरील एका तीव्र वळणावर नियंत्रण गमावले आणि गाडी थेट उलटली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम गेल्या 3-4 महिन्यांपासून थांबले असून, रस्ता खोदलेला असतानाच सोडून दिला गेला आहे. याच अपूर्ण आणि धोकादायक रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

हेही वाचा : छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

या मार्गावरून 7 ते 8 गावाचे नागरिक रोज प्रवास करतात. मात्र, रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. यापूर्वीही काही दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक जखमी झाले होते. अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी प्रशासनाकडून तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

अपघातग्रस्त टँकरचा काही भाग रस्त्यावर पसरल्याने इतर वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी संयुक्त प्रयत्न करून रस्त्यावरील अडथळा दूर केला. मात्र, वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाहनांच्या रांगा लागून राहिल्या होत्या.

स्थानिक ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे रस्त्याचे काम महिन्यांपासून रखडले आहे. पावसाळा जवळ येत असताना रस्ता पूर्ण न होणे ही मोठी धोक्याची घंटा आहे. जर लवकरात लवकर काम पूर्ण झाले नाही, तर भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर अपघाताची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींना ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number