Sunday, April 20, 2025 05:21:58 AM

पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक होत नाहीय ना? मीटर 'झिरो' करण्यासोबतच 'हे'ही आवश्यक

पेट्रोल-डिझेल भरताना मीटरवर 'झिरो' पाहण्याशिवाय आणखी काही बाबी फारच सावधगिरीने बघणं आवश्यक आहे. कारण अजूनही असे अनेक मार्ग आहेत, ज्याचा वापर करुन तुमची फसवणूक होऊ शकते.

पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक होत नाहीय ना मीटर झिरो करण्यासोबतच हेही आवश्यक

मुंबई : गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरताना रिडींग शून्यापासून सुरू करण्यासाठी मीटरवर झिरो येणे आवश्यक आहे, हे आपल्या सर्वांना तर माहीत आहेच. मात्र, तेवढा एकच फसवणूक रोखण्याचा मार्ग आहे का? आणखी कोणत्या मार्गाने फसवणूक होऊ शकते का? चला, जाणून घेऊ यात आणखी कोणत्या बाबींविषयी सावध राहणं आवश्यक आहे..

आपण अनेकदा गाडीला पेट्रोल किंवा डिझेल भरायला पेट्रोल पंपावर जातो, आणि तिथे काम करणारे कर्मचारी नेहमी सांगतात, "सर, मीटरवर झिरो आहे का बघा." इंधन भरताना मीटर रिडिंग शुन्यापासून सुरु होणं गरजेचं आहेच. यामुळे इंधन चोरी थांबवता येते हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर मीटर ‘0.00’ वर आहे असं दिसलं, की आपण निश्चिंत होतो की, आता कुठलीही फसवणूक होणार नाही.

हेही वाचा - पगार लगेच संपतो आणि महिनाअखेरीस वांदे होतात? हा खास फॉर्म्यूला करून देईल बचत

मीटर ‘झिरो’ झाला की खरंच फसवणूक थांबते का?
पेट्रोल-डिझेल भरताना आणखी काही बाबी  फारच सावधगिरीने बघणं आवश्यक आहे. कारण अजूनही असे अनेक मार्ग आहेत, ज्याचा वापर करुन तुमची फसवणूक होऊ शकते.

आणखी काही वेळ मीटरकडे पाहत राहावे
मीटरवर ‘झिरो’ दिसल्यानंतर पूर्ण पेट्रोल भरून होईपर्यंत मीटरकडे पाहत राहावे. मोठ्या जास्त पेट्रोल भरायचे असल्यास जास्त वेळही लागू शकतो. तेव्हा अधून-मधून तिकडे पाहात रहावे. कारण, काही पंपांवर मीटर थेट 5 किंवा 6 रुपयांवर जाऊन थांबतो आणि तिथून पेट्रोल भरायला सुरुवात होते. असं झालं तरी देखील तुमची फसवणूक होऊ शकते. शिवाय, यानंतरही अचानक मीटर पुढे सरकत नाही ना, हे पाहणं महत्त्वाचं आहे

100, 200, 500 रुपयांचं पेट्रोल...नेमकी इथेच फसवणूक!
आपण बऱ्याच वेळा 100, 200 किंवा 500 इतकं पेट्रोल भरतो आणि तेवढी रक्कम सांगून बाजूला होतो. अशा वेळी, काही पंपांवर मशीनमध्ये आधीच रक्कम 'प्रीसेट' करून ठेवलेली असते. तेव्हा पेट्रोल भरतानाच फसवणूक होते, आणि आपल्याला वाटतं आपण योग्य प्रमाणात पेट्रोल भरलंय. पण तसं अनेकदा नसतं.

हे आहेत उपाय
फसवणुकीपासून वाचण्यासाठी लिटर मोजून पेट्रोल भरायला सांगणं हा चांगला पर्याय आहे. जसं की – "दोन लिटर भरून द्या", "तीन लिटर द्या", "पाच लिटर टाका" वगैरे. हे केल्याने पेट्रोलचं मोजमाप स्पष्ट होतं आणि चुकीच्या प्रीसेट ट्रिकपासून बचाव होतो किंवा 100 ऐवजी 108, 200 ऐवजी 216 अशा रकमाही आपण सांगू शकतो. एक लिटर पेट्रोलचा दर आणि आपण सांगितलेल्या रकमेत मिळालेले पेट्रोल यांचाही ताळमेळ जमतो का, ते पाहावे.

विश्वासार्ह पेट्रोल पंप निवडा
तुमच्या भागातील विश्वासार्ह पेट्रोल पंप निवडा. अशा पंपांवर 2-3 वेळा लिटर मोजून पेट्रोल भरून पहा आणि खात्री करा की, तिथं फसवणूक होत नाहीये.

फसवणूक झाली तर अशी तक्रार करावी
जर तुमच्यासोबत फसवणूक झाली, तर थेट पंप मालकाकडे तक्रार करू शकता. कोणतीही तक्रार तोंडी करू नये, लेखी करावी. तक्रार दिलेल्या कागदाची झेरॉक्स प्रत घेऊन त्यावर पोच घ्यावी. याशिवाय, मेलवरूनही तुम्ही तक्रार करू शकता.

यासोबतच, वजन-मापांसंबंधी शासकीय कार्यालयातही तुम्ही तक्रार करू शकता. शासकीय कार्यालयात देखील कोणतीही तक्रार रीतसर लेखी स्वरूपात द्यावी. तोंडी तक्रारीची दखल घेतली जात नाही. तसेच, काही दिवसांनी तेथे परत एक-दोनदा जाऊन तक्रारीवर काय कारवाई झाली, याची माहिती घ्यावी. ही माहिती देखील लेखी स्वरूपात अर्ज देऊन मागवावी. यामध्ये थोडा वेळ जातो. मात्र, समस्येचं योग्य प्रकारे निराकरण होतं.

हेही वाचा - पर्सनल लोनचाही करता येतो विमा! 'या' अडचणींमध्ये मिळतात अनेक फायदे

तसेच, संबंधित कंपनीच्या टोल फ्री हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार नोंदवता येते.
भारतीय तेल महामंडळ (Indian Oil) – 1800 2333 555
एचपी (HP) – 1800 2333 555
भारत पेट्रोलियम (BPCL) – 1800 22 4344
तुमचा कष्टाचा पैसा महत्त्वाचा आहे. म्हणूनच, फसवणुकीपासून सतर्क राहणं महत्त्वाचं आहे.


सम्बन्धित सामग्री