नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी) चीन, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांवर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर प्रत्येकी 25 टक्के आणि चीनवर 10 टक्के आयात शुल्क लादण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. यानंतर आशियाई बाजारात सध्या मोठी घसरण दिसून येत आहे. जपानचा निक्केई निर्देशांक, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक घसरला.
याशिवाय, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर, कॅनडाचे हंगामी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही 155 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंच्या आयातीवर 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या टॅरिफ (आयात शुल्क) वॉरमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
हेही वाचा - Budget 2025 : 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जेचे लक्ष्य, संशोधनासाठी इतकी तरतूद
भारतीय शेअर बाजारावरही परिणाम
तैवानच्या शेअर बाजारामध्येही 3.5% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांकातही 2% पेक्षा जास्त घसरण दिसून आली. तर, ऑस्ट्रेलियन शेअर बाजारावरही याचे परिणाम दिसून येत आहेत. अमेरिकन फ्युचर्समध्येही मोठी घसरण आली आहे. डाऊ फ्युचर्स 550 अंकांनी घसरून व्यवहार करत आहे. भारताच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, बाजार उघडताच सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी सोमवारी गडगडला होता. आज मंगळवारीही बाजार उघडताच सेन्सेक्स 700 अंशांनी आपटला. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले.
कमोडिटी मार्केटवरही परिणाम
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारावरही परिणाम होत आहे. ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, ते प्रति बॅरल 76 डॉलर्सच्या पुढे गेले आहे. चलन बाजारातही डॉलर निर्देशांक 1% पेक्षा जास्त वाढून 109.77 वर पोहोचला आहे.
हेही वाचा - Budget 2025 : कर्करोगाची औषधे स्वस्त होणार, 10 हजार वैद्यकीय जागा वाढणार
महागाईचे चटके वाढणार
प्रथम अमेरिकेने आणि अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून कॅनडाने केलेल्या आयात शुल्क लादण्याच्या (टॅरिफ) घोषणेनंतर, दोन्ही देशांमध्ये तसेच जगभरातील इतर बाजारपेठांमध्ये अनेक वस्तूंच्या किमती वाढतील. कार आणि इलेक्ट्रॉनिक्सपासून ते खेळणी आणि खाद्यपदार्थांपर्यंतच्या वस्तूंवर याचे परिणाम होणार आहेत. अमेरिका दरवर्षी कॅनडा, मेक्सिको आणि चीनसोबत 1.6 ट्रिलियन डॉलर्सचा व्यापार करते. सध्या, या अमेरिकेला फक्त कॅनडाकडून प्रत्युत्तर मिळाले आहे. मेक्सिको आणि चीनने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कॅनडाने अमेरिकेतून आयात होणाऱ्या 155 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर 25% कर लादण्याची घोषणा केली आहे. या टॅरिफ वॉरमुळे महागाई वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.