Mumbai High Tide Alert: दीर्घकाळाच्या उकाड्यानंतर केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून आता मुंबईकरांचीही पावसाची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, मान्सूनच्या स्वागतासोबतच मुंबईसाठी एक चिंताजनक इशाराही समोर आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या किनारपट्टीला समुद्रातील प्रचंड उंच लाटांचा सामना करावा लागणार असून जून ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 24 वेळा तीव्र भरतीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
4.5 मीटरपेक्षा उंच लाटांचा धोका
महानगरपालिका आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रातील लाटांची उंची 4.5 मीटरपेक्षा जास्त झाल्यास ती मोठी भरती मानली जाते. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहण्याचा अंदाज असला, तरी समुद्रातील भरतीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एकट्या जून महिन्यातच 6 वेळा मोठ्या लाटा मुंबई किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जूनमध्येच समुद्राचा रौद्रावतार
जून महिन्यात 14 ते 19 जून या कालावधीत समुद्र विशेषतः खवळलेला राहणार आहे. या काळात लाटांची उंची 4.64 मीटर ते 4.87 मीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 16 जून रोजी दुपारी 1:05 वाजता जूनमधील सर्वाधिक 4.87 मीटर उंचीची भरती येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या काळात समुद्रकिनाऱ्यांवर जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुलैमध्ये सर्वात मोठा धोका
यंदाच्या मान्सूनमधील सर्वात धोकादायक कालावधी जुलै महिन्यात असणार आहे. 13 ते 18 जुलै दरम्यान तब्बल 6 वेळा समुद्राची पातळी धोक्याची मर्यादा ओलांडणार आहे. विशेष म्हणजे 16 जुलै 2026 रोजी दुपारी 1:36 वाजता संपूर्ण पावसाळ्यातील सर्वात उंच 4.89 मीटर लाट उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जुलै महिन्यात किनारपट्टी भागात प्रशासन अधिक सतर्क राहणार आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही सतर्कतेची गरज
ऑगस्ट महिन्यात 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान 5 वेळा मोठ्या भरतीचा अंदाज आहे. यामध्ये 14 ऑगस्ट रोजी समुद्रातील लाटा 4.83 मीटरपर्यंत पोहोचू शकतात. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक 7 वेळा हाय टाइडची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 ते 13 सप्टेंबर तसेच 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत समुद्र अत्यंत अशांत राहण्याची शक्यता आहे.
पालिकेचा हाय अलर्ट; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
मुंबई महानगरपालिका आणि हवामान विभागाने नागरिकांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पाऊस आणि हाय टाइड एकाच वेळी आल्यास शहरात पाणी तुंबण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. भरतीच्या निश्चित तारखा आणि वेळांमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.