मुंबई: भाईंदरकरांसाठी कालची संध्याकाळ काळरात्र ठरली. इंद्रलोक पोलीस चौकीच्या मागील मोकळ्या जागेत बस्तान मांडलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांना लागलेल्या भीषण आगीने केवळ वस्तीच नव्हे, तर व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडेही काढले आहेत. या भयंकर अग्नितांडवात तीन निष्पाप जीवांचा कोळसा झाला असून, घटनास्थळी सापडलेल्या तब्बल 25 गॅस सिलिंडरने सुरक्षेच्या मुद्द्यावर एकच खळबळ उडवून दिली आहे.
भाईंदर पूर्वेकडील लोढा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत अनधिकृत झोपडपट्ट्यांचे मोठे जाळे पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी रात्री आठच्या सुमारास या दाट वस्तीत अचानक आगीचा भडका उडाला. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले आणि क्षणाधार्त अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. वाऱ्याच्या वेगासोबत आगीचे लोळ वाढत गेले, ज्यामुळे स्थानिकांमध्ये एकच हाहाकार उडाला. आगीने आजूबाजूला उभ्या असलेल्या अनेक वाहनांनाही कवेत घेतले.
या दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक आणि गूढ बाब म्हणजे आगीत झालेले सिलिंडरचे भयंकर स्फोट. आगीच्या ज्वाळांनी वेग घेतल्यानंतर परिसरात एकापाठोपाठ एक असे अनेक स्फोट ऐकू आले. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पोलीस उपायुक्त (डीसीपी) राहुल चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
याशिवाय अनेक जण जखमी झाले असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृत्यूशी झुंज देत तब्बल 25 सिलिंडर या धगधगत्या आगीतून बाहेर काढले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा गॅस सिलिंडरचा साठा या अवैध झोपडपट्टीत आलाच कसा? त्याचा वापर कशासाठी होत होता? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
हेही वाचा: Ravindra Jadeja: हार्दिक पांड्यानंतर आता रवींद्र जडेजाचा जलवा; टी20 क्रिकेटमध्ये रचला असा विक्रम जो जगात फक्त काही जणांनाच जमला
आगीची माहिती मिळताच नवघर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि अग्निशमन दल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत.
ही घटना केवळ एक दुर्दैवी अपघात नसून, प्रशासकीय दुर्लक्षाचा हा एक क्रूर बळी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्थानिक नगरसेवक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनधिकृत झोपडपट्टीबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला. वेळीच कारवाई न केल्याने आज तीन निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. या भयावह घटनेनंतर तरी प्रशासन झोपेतून जागे होणार का आणि अशा अवैध वस्त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: देशभरातील साहित्यिक अधिकाऱ्यांना मिळणार व्यासपीठ; दिल्लीत होणार महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन रंगणार