Mulund Traffic Update : मुलुंड पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंडकडे वळताना म्हाडा जंक्शनजवळ निर्माण होणाऱ्या नियमित कोंडीवर उपाय म्हणून सुचवलेला 60 फूट रुंदीचा पर्यायी जोडरस्ता आता पूर्णपणे मंजूर झाला आहे. हा नवा मार्ग सीधे टाटा कॉलनीपर्यंत जोडला जाणार असून त्यामुळे महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना गर्दी टाळत सहज पुढे जाता येणार आहे.
एका महिन्यात काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
प्राप्त माहितीनुसार, आज या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार असून पुढील चार आठवड्यांत संपूर्ण काम पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. रस्ता वापरासाठी खुला झाल्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ भेडसावणारी तीव्र वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा – Pune Leopard Attack: भीतीचं सावट ! शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला, प्रतिकार केला पण…
वर्षांपासूनची मागणी पूर्ण
या पर्यायी मार्गाची गरज रहिवासी, वाहनचालक आणि प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून मांडत होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर मंजुऱ्या मिळवण्यात मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नवीन जोडरस्ता तयार झाल्यानंतर वाहतुकीचा ताण विभागला जाईल आणि पूर्वेकडील प्रवेश अधिक सुरळीत, सोपा आणि वेगवान होईल. काम पूर्ण होताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुलुंडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.