मुंबई : प्रथमच मुंबई महानगरपालिकेकडून 426 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सोडतीसाठी 16 ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-2034 च्या विनियम 15 व 33 (20) (ब) अन्वये प्राप्त सदनिकांसाठी सोडत काढण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली - 2034 च्या विनियम 15 व 33 (20) (ब) अन्वये प्राप्त 426 घरांच्या विक्रीसाठी पालिकेकडून 16 ऑक्टोबर 2025 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अत्यल्प आणि अल्प गटासाठी या सदनिका उपलब्ध असणार आहेत.
हेही वाचा : Supreme Court : मृत्युदंडासाठी पर्यायी पद्धतींचा विचार करा; सुनावनीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला सूचना
या सदनिकांच्या विक्रीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज मागविण्यात येत असून 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच अर्जदारांना 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर, अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम 14 नोव्हेंबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल. तर सोडत प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडेल. या सोडतीतून निवड झालेल्या यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. या सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिका 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून वेबसाईटवर उपलब्ध होईल. प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रकारची माहिती तसेच अटी व शर्तींबाबत पुस्तिकेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेतील सदनिकांसंदर्भात आवश्यक बदल करण्याचा अधिकार मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे आहेत.
दरम्यान, या सोडतीसंदर्भात माहिती व मदतीसाठी 022-22754553 या मदतसेवा क्रमांकावर किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. किंवा ‘सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), चौथा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – 400 001’ या पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.