Thursday, February 19, 2026 09:24:34 AM

Palghar Bullet Train Project: बुलेट ट्रेनसाठी सज्ज! पालघरच्या शिरपेचात मानाचा तुरा; दुसऱ्या महाकाय बोगद्याचे काम फत्ते

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. येथील दुसऱ्या मोठ्या बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

palghar bullet train project बुलेट ट्रेनसाठी सज्ज पालघरच्या शिरपेचात मानाचा तुरा दुसऱ्या महाकाय बोगद्याचे काम फत्ते

Palghar Bullet Train Project : पालघर जिल्ह्याच्या विकासाला आता बुलेट ट्रेनचा वेग मिळाला आहे. डहाणूच्या डोंगराळ भागात आता बुलेट ट्रेनसाठीच्या एक मोठ्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. यासह बुलेट ट्रेन प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पांतर्गत डहाणू येथील 'एमटी-6' (MT-6) या डोंगरावरील दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. याआधी 'एमटी-5' (MT-5) चे भुयारीकरण पूर्ण झाले होते. मंगळवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी या 'ब्रेक-थ्रू' सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

न्यू ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवान काम
पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण 7 बोगदे प्रस्तावित असून, त्यापैकी 456 मीटर लांबीचा हा MT-6 बोगदा अवघ्या 12 महिन्यांत पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, यासाठी 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' (NATM) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. जमिनीखालील गुंतागुंतीच्या भौगोलिक रचनेत ड्रिलिंग आणि नियंत्रित स्फोटांच्या साहाय्याने हे काम अत्यंत अचूकपणे पार पाडण्यात आले. या बोगद्याची रुंदी 14.4 मीटर असून, महाराष्ट्रात एकाच महिन्यात दुसऱ्यांदा डोंगरावरील बोगद्याचे काम पूर्ण होण्याची ही मोठी बाब ठरली आहे.

एकूण 27.4 किलोमीटरचे भुयारी जाळे आणि गुजरात-महाराष्ट्र कनेक्टिव्हिटी
संपूर्ण 508 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये एकूण 27.4 किलोमीटरचे बोगदे असणार आहेत. यामध्ये जमिनीखालील 21 किलोमीटर आणि जमिनीवरील 6.4 किलोमीटरच्या बोगद्यांचा समावेश आहे. एकूण 8 डोंगरी बोगद्यांपैकी 7 एकट्या महाराष्ट्रात आहेत, ज्यांची एकत्रित लांबी 6.05 किमी आहे. यापूर्वी ठाणे ते बीकेसी दरम्यानचा 5 किमीचा भूमिगत बोगदा सप्टेंबर 2025 मध्ये पूर्ण झाला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा (बिलीमोरा ते सुरत) पुढील वर्षी सुरू करण्याचे नियोजन असून महाराष्ट्रातील कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा - Mumbai Belasis Flyover: विक्रमी वेळेत काम पूर्ण करूनही मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल का आहे बंद? धक्कादायक कारण समोर

पालघर जिल्ह्यात रेल्वे प्रकल्पांचा धडाका
खासदार हेमंत सावरा यांनी यावेळी पालघरच्या प्रगती माहिती दिली. ते म्हणाले की, बुलेट ट्रेनसोबतच 'वाढवण बंदर' आणि 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' (DFCC) मुळे पालघरच्या विकासात आणखी हातभार लागणार आहे. जिल्ह्यात रेल्वे प्रकल्पांचा धडाका सुरू असून बोरिवली-विरार 5 व्या व 6 व्या मार्गिकेचे आणि विरार-डहाणू 3 ऱ्या व 4 थ्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. पालघर रेल्वे स्थानकाचा 'अमृत भारत' योजनेत पुनर्विकास होत असून वसईत नवीन मेगा टर्मिनल उभे राहणार आहे. 2014 नंतर महाराष्ट्राला रेल्वेसाठी वार्षिक सरासरी 23,000 कोटींचा निधी मिळत असून सध्या राज्यात 1,70,000 कोटींहून अधिक रकमेची कामे सुरू आहेत.

भविष्यात स्थानिक रोजगार आणि उद्योगांचा विकास
बुलेट ट्रेनच्या या यशस्वी टप्प्यामुळे पालघर जिल्हा आता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांशी जोडला जात आहे. डहाणूतील या बोगद्याचे यशस्वी ब्रेक-थ्रू केवळ तांत्रिक यश नसून, ते स्थानिक रोजगार आणि उद्योगांसाठी महत्त्वाचे  ठरणार आहे. रेल्वे प्रशासने दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित बोगद्यांचे कामही वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे मुंबई आणि गुजरातदरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. यात पालघर हे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

हेही वाचा - Pune Mumbai ST Bus : पुणे-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! हिंजवडीतून थेट ST सुटणार; दीड तासाचा कोंडीचा त्रास कायमचा मिटणार


सम्बन्धित सामग्री