Mumbai Water Metro: मुंबईतील जलवाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. जल मेट्रो प्रकल्पासाठी मागवण्यात आलेली पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल झाली असून लवकरच तिच्या चाचण्या सुरू होणार आहेत. या फेरीच्या आगमनामुळे मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक प्रकल्पाला वेग मिळणार असल्याचे मानले जात आहे.
फेरीची तांत्रिक चाचणी घेण्यात येणार
‘कॅन्डेला पी-12’ या अत्याधुनिक इलेक्ट्रिक फेरीने नुकतीच मुंबईत प्रवेश केला असून सध्या ती जवाहरलाल नेहरू बंदरात (JNPT) आहे. आवश्यक सीमाशुल्क प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या फेरीची तांत्रिक चाचणी घेण्यात येणार आहे. चाचण्या यशस्वी ठरल्यानंतर प्रवासी सेवेसाठी ती कार्यान्वित केली जाईल.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल मेट्रो योजनेअंतर्गत अशा एकूण 11 इलेक्ट्रिक फेरींची खरेदी करण्यात येत आहे. ताशी सुमारे 40 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या फेरीमध्ये एकावेळी 30 प्रवासी प्रवास करू शकतात. समुद्रातील लाटांमध्येही सुरक्षित आणि स्थिर प्रवासाचा अनुभव देण्याचा दावा या तंत्रज्ञानामागील कंपनीने केला आहे. दरम्यान, ही सेवा दोन मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन आहे. गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग हा पहिला मार्ग असेल, तर मांडवा ते वर्सोवा-मढ हा दुसरा मार्ग असणार आहे. या सेवेमुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
340 किलोमीटरच्या जलवाहतूक जाळ्याची योजना
मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 340 किलोमीटर लांबीचे जल मेट्रो नेटवर्क उभारण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून त्याअंतर्गत आधुनिक टर्मिनल्स, जलमार्ग आणि इलेक्ट्रिक फेरींची सुविधा विकसित केली जाणार आहे. योजनेनुसार मुंबई परिसरात 125 किलोमीटर अंतरावरील 21 जलमार्ग आणि 20 स्थानकांचा विकास होणार आहे. याशिवाय आणखी 215 किलोमीटर लांबीचे 16 नवीन मार्ग आणि 24 स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 201 इलेक्ट्रिक आणि हायब्रिड फेरींच्या खरेदीवर मोठा खर्च केला जाणार आहे.
आली रे आली .. CANDELA आली ! R u ready Mumbai ?? Thank you for your support Hon CM @Dev_Fadnavis ji @CMOMaharashtra pic.twitter.com/04M8OxiTy5 — Nitesh Rane (@NiteshNRane) May 27, 2026
देशातील इतर शहरांनाही लाभ
मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये जल मेट्रो सेवा विस्तारण्याची योजना आखण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात श्रीनगर, पाटणा, वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज या शहरांमध्ये जल मेट्रो सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतरच्या टप्प्यात आसाममधील तेजपूर आणि दिब्रुगड यांसारख्या शहरांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे. कोची जल मेट्रोच्या यशानंतर देशभरात अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक आणि आधुनिक जलवाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन दिले जात असून मुंबई हा या महत्त्वाकांक्षी उपक्रमातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जात आहे.