Mumbai : मुंबईत सध्या गणेशोत्सवानिमित्त अनेक मंडळांकडून गणरायाच्या जोरदार आगमनाची तयारी सुरु झाली आहे. मुंबईतील विविध गणेश मंडळांचे राजे-महाराजे आपापल्या मंडपांमध्ये दाखल होत असताना आणि संपूर्ण मुंबापुरीला गणरायाच्या उत्सवाचे वेध लागले असताना शनिवारी अघटित घडले. शनिवारी मुंबईतील भुलेश्वरचा राजा (Bhuleshwar Cha Ganpati 2026) आपल्या मंडपात विराजमान होण्यापूर्वीच मोठं विघ्न कोसळलं आहे. बाप्पाच्या आगमनादरम्यान भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्तीचा तोल जाऊन मूर्ती कोसळली.
यात पाच जण जखमी झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यंदा लेश्वर राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे हे 63 वे वर्ष आहे. भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्ती भायखळ्यातील अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून भुलेश्वरला नेण्यात येत होती. यादरम्यान मंडपापासून 50-60 मीटर अंतरावर अचानक मूर्ती कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही खड्डे दिसत नसून प्राथमिक तपासानुसार, तोल गेल्यामुळे ही घटना घडली असावी असे म्हटले जात आहे. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी बृजेश जोशी हे दोघे ठार झाले असून, अन्य पाच जण जखमी आहेत.
मंडपापासून काही अंतरावर असतानच ज्या क्रेनवर या 22 फूट उंच मूर्तीचा भार तोलून धरला होता ती क्रेन कमजोर निघाली आणि क्रेनमधून निसटलेली राजाची मूर्ती सरळ खाली कोसळली. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुलेश्वरमधील समुद्रीमाता मंदिराजवळ हा प्रकार घडला. आता भुलेश्वर राजाची भंगलेली मूर्ती विसर्जित केली जाईल आणि मग प्राथमिक तपास करून गुन्हे दाखल कले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.