मुंबई: शिवसेना उबाठा गटाच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळीची गोड बातमी दिली आहे. बेस्ट कामगार सेनेच्या दबावामुळे प्रशासनाने तब्बल 31 हजार रुपयांचा बोनस तात्काळ मंजूर केला असून, ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर 23 हजार 596 बेस्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे.
हेही वाचा: Mega Block : प्रवाशांनो सावधान! उद्या मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; लोकलसह एक्सप्रेस गाड्यांवरही होणार परिणाम; वाचा सविस्तर
दिवाळी बोनस देण्यास विलंब झाल्याने शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने गुरुवारी वडाळा येथे आंदोलन छेडले होते. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी प्रशासनाला इशारा दिला होता की, बोनस जाहीर न झाल्यास ते रस्त्यावर उतरून वाहतूक रोखतील. या इशाऱ्यामुळे, प्रशासनाने तात्काळ हालचाल केली आणि अवघ्या 24 तासांत बोनसची घोषणा करून रक्कम खात्यात जमा केली. दरम्यान, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही 'एक्स'वरून योग्य बोनस देण्याची मागणी केली होती.
आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आज दिवाळी सुरु होऊनही मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना अजूनही हक्काचा 'बोनस' मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जाण्यासाठी हा बोनस अत्यावश्यक असतो. आमची मागणी आहे की मागच्या वर्षाहूनही अधिक रकमेचा बोनस महानगरपालिकेच्या व बेस्टच्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेकडून तत्काळ मिळायला हवा. महानगरपालिकेची मदत बेस्टला लागेल हे जरी सत्य असलं तरी ती करणं हे महानगरपालिकेचं कर्तव्यच आहे'.
या निर्णयामुळे, बेस्टमधील 23 हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दिवाळीत शिवसेना उबाठा गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या तत्पर निर्णयामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी खरंच गोड ठरली आहे.