Uddhav Thackeray On Mumbai Mayor: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर ‘मातोश्री’वर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. ‘मुंबईचा महापौर आपलाच व्हावा हे आपले स्वप्न आहे आणि देवाच्या मनात असेल तर ते नक्की पूर्ण होईल,’ असे सूचक विधान करत त्यांनी मुंबईच्या सत्तेबाबत अजूनही आशा जिवंत असल्याचे संकेत दिले आहेत.
‘त्यांच्याकडे धन, आपल्याकडे जनशक्ती’
उद्धव ठाकरे यांनी निवडून आलेल्या शिलेदारांचे कौतुक करताना विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘गद्दार निघून गेले, पण ते शिवसैनिकांची निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. विरोधकांकडे फक्त ‘धन’ होते, पण तुमच्याकडे ‘तन आणि मन’ होते. याच शक्तीच्या जोरावर तुम्ही त्यांना घाम फोडला आहे. या यशाचे खरे मानकरी तुम्ही आहात, मी फक्त निमित्तमात्र आहे. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही लढलात, त्याचा मला अभिमान आहे.’
मुंबई गहाण ठेवण्यासाठीच गद्दारांचा विजय
दरम्यान, सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले की, त्यांनी मिळवलेला विजय हा फसवणुकीचा आहे. ‘साम, दाम, दंड, भेद आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून त्यांनी हा विजय मिळवला आहे. मुंबई गहाण ठेवण्यासाठीच हा डाव आखला गेला असून, या पापाला मराठी माणूस कधीच माफ करणार नाही,’ असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.
लढाई अजून संपलेली नाही
शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी भविष्यातील संघर्षाची हाक दिली. ‘कागदावरची शिवसेना संपवल्याचा आव ते आणत असतील, पण जमिनीवरची शिवसेना संपवणे शक्य नाही. ही जिद्द कोणीही विकत घेऊ शकत नाही. ही केवळ एक सुरुवात आहे, आपण जिद्दीच्या जोरावर पुन्हा पूर्ण ताकदीने उभे राहू,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.