राज्यात भेसळीविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली असली, तरी भेसळखोरांचे धाडस काही कमी होताना दिसत नाही. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाया सुरू असतानाही नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे प्रकार समोर येत आहेत. अशातच नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे.
ठाणे एफडीएच्या पथकाने महापे येथील मे. पी. के. डेअरीवर अचानक छापा टाकला. यावेळी डेअरी मालक प्रदीप यादव याच्या संगनमताने शिवेंद्र जैस्वाल हा दुधाची पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि चिलरच्या थंड पाण्याचे मिश्रण टँकरमध्ये ओतताना रंगेहाथ पकडला गेला. 1 किलो स्किम मिल्क पावडरमध्ये 8 ते 10 लिटर थंड पाणी मिसळून हे भेसळयुक्त दूध गायी-म्हशीचे शुद्ध दूध असल्याचे भासवून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील अनेक डेअऱ्यांना पुरवले जात होते.
अन्न सुरक्षा परवाना नसल्यामुळे मे. पी. के. डेअरीचा व्यवसाय तत्काळ बंद करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान विविध डेअऱ्यांमधून 1 लाख 85 हजार रुपये किंमतीचे एकूण 4710 लिटर भेसळयुक्त दूध सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी नष्ट करण्यात आलेय. यासोबतच याशिवाय 129 किलो पनीर, 473 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 88 किलो क्रीम असा लाखोंचा माल जप्त करत तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.