महाविकास आघाडीमधील अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या ४० मालमत्ता जप्त केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना नेते यशवंत जाधव यांना मोठा झटका बसला आहे. यशवंत जाधव यांच्या ४० मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. या ४० मालमत्तांमध्ये भायखळ्यातील ३१ आणि वांद्रे येथील ५ कोटींचा फ्लॅट अशा मालमत्तेचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली असल्यामुळे शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला असून या छाप्यात त्यांना एक डायरी सापडली. या डायरीमध्ये जाधवांनी केलेल्या अनेक व्यवहारांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांची आर्थिक उलाढाल या डायरीच्या माध्यमातून पुढे आली. तसेय याबाबत त्यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आता आयकर विभागाने केलेल्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून चर्चा सुरु झालीये.