Malad Crime: मुंबईची लोकल म्हणजे लाखो प्रवाशांचा रोजचा श्वास. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, ताणतणाव आणि असहिष्णुता आता जीवघेणी ठरू लागली आहे. लोकलच्या दारात झालेल्या एका किरकोळ वादातून थेट हत्या घडल्याची धक्कादायक घटना मालाड रेल्वे स्थानकावर समोर आली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मालाड रेल्वे स्थानकावर 24 जानेवारी रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकल थांबताच दोन प्रवाशांमध्ये आधी झालेला वाद अचानक उफाळून आला आणि क्षणार्धात हिंसक वळण घेतलं. या घटनेत अलोक सिंग या प्रवाशाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, लोकलमधून उतरण्याच्या मुद्द्यावरून अलोक सिंग यांचा दुसऱ्या एका प्रवाशासोबत वाद झाला होता. गर्दीमुळे धक्काबुक्की झाली आणि त्यातूनच शाब्दिक वाद वाढत गेला. सुरुवातीला हा वाद किरकोळ वाटत असतानाच, लोकल मालाड स्थानकावर थांबल्यानंतर आरोपी प्रवाशाने अचानक सोबत असलेल्या धारदार शस्त्राने अलोक सिंग यांच्यावर हल्ला केला.
हल्ला इतका अचानक आणि भयंकर होता की, काही क्षणातच अलोक सिंग रक्ताच्या थारोळ्यात प्लॅटफॉर्मवर कोसळले. स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या गडबडीत आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत अलोक सिंग यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून, त्याच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर लोकल प्रवाशांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. रोजच्या प्रवासात होणारे छोटे वाद, वेळेचा ताण आणि गर्दी यामुळे प्रवाशांचा संयम सुटत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. मुंबईसारख्या शहरात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, लोकलमधील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.