मुंबई: मुंबई उपनगरातील जोगेश्वरी परिसरात आज सकाळी भीषण आगीची घटना घडली आहे. एस व्ही रोडवरील बेहमपाडा भागातील जे एन एस बिझनेस सेंटर या उंच इमारतीला आज सकाळी 10:51 वाजल्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र धुराचे लोट पसरले आहे.
हेही वाचा: Navi Mumbai International Airport Issue: नवी मुंबई विमानतळ; दि. बा. पाटील नावावरून पुन्हा आंदोलनाची चिन्हे
आग लागल्याची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलासोबत पोलीस, अॅम्ब्युलन्स सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), बीएमसीच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांसह वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगीचा भडका एवढा मोठा आहे की, ती दोन ते तीन मजल्यांपर्यंत पसरली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिसरातील लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या घटनेमुळे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.