मुंबई : सध्या राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस असून मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेदेखील शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तर राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईविरोधीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन पुकारले आहे. तर अमरावतीमध्येही आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या सर्व आंदोलकांना सामोरे जाण्याचे आव्हान राज्य सरकार समोर आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वारंवार प्रयत्न करत असून ओबीसी आंदोलकांना मात्र पोलीस प्रशासनाकडून आडकाठी आणली जात आहे. आता सरकार या सर्व आंदोलनांना कसे शमवणार हे पाहावे लागेल.
जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. सरकारचा शिष्टमंडळ हे छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी आहे. मात्र आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेला नाही. त्यामुळे एकीकडे मराठा समाज आक्रमक आहे तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये थांबलेला आहे. आज साधारणतः 12 ते 1 दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत हे सरकारच शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. त्यानंतर हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे मराठा आंदोलकांकडून तब्बल दोन तास रस्तारोको करण्यात आला. तर पैठण शहरात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आहे. मराठा समाज बांधवांकडून पैठण शहरातील सह्याद्री नाका चौकात रास्ता रोको करण्यात आला. एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार असल्याची भूमिका या ठिकाणच्या आंदोलकांनी घेतली होती. तब्बल दोन तासानंतर मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारक यांनी महामार्गावर येऊन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दोन तासानंतर महामार्ग हा आंदोलकांनी मोकळा केला आहे.
तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेयांनी मुंबईच्या दिशेने ‘महा एल्गार मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनीया मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी लक्ष्मण हाके मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. दौंड तालुक्यातील पाटस येथून हा मोर्चा थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. प्रा. लक्ष्मण हाके हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून वाजतगाजत पाटस टोलनाक्याकडे रवाना झाले आहेत. राज्यभरातील ओबीसी बांधवांनी पाटस येथे एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार पाटस टोलनाक्यावर सर्व ओबीसी कार्यकर्ते एकत्र जमून तेथून मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांना पोलिसांकडून अडवले जात असून हाकेंनी देखील मुंबईत येणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबईत महागाईच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यामध्ये सध्या खाद्यपदार्थ सीएनजी, एलपीजी, दूध अशा अनेक गोष्टींवर झालेल्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सामील झाल्या असून त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.