22 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या औषध निरीक्षक, गट-ब संवर्गाची चाळणी परीक्षेच्या काही दिवस आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातील काही प्रश्न मिळवून स्वतंत्र प्रश्नसंच तयार केल्याचा आरोपासह हा प्रश्नसंच पुढे इतर व्यक्तींना देण्यात आल्याची माहिती यावेळी समोर आली होती. एमपीएससीच्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून यात आता महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. आरोपींनी आणखी उमेदवारांना प्रश्न दिल्याचा संशय असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गौरव उर्फ लोकेश पाटील या तरुणाने त्याची प्रियसी ऋतुजाला तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातून 77 प्रश्न प्राप्त करून त्याचा वेगळा प्रश्नसंच तयार करून दिला होता.
यात ऋतुजाला काही प्रश्न चुकीचे सोडवण्याचाही सल्ला देण्यात आला होता, जेणेकरुन संशय येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींनी काढलेल्या 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न त्यांच्या मार्कांसह अगदी तसेच्या तसे परीक्षेत आले होते. समोर झालेल्या चॅट्समध्ये देखील दहा प्रश्न चुकीच सोडवण्याच सांगितल्याचं स्पष्ट झालं आहे.
या प्रकरणातील आरोपी गौरव पाटील आणि त्याची परीक्षार्थी मैत्रीण ऋतुजा पाटील यांच्यातील व्हॉट्स ॲपवरील चॅट समोर आले आहेत. त्यातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी याप्रकरणात मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने एमपीएससीच्या (MPSC) तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे.