मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून विविध तांत्रिक कामांसाठी विशेष ब्लॉक आणि मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शेकडो लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार असून अनेक सेवा रद्द करण्यात येणार आहेत. सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी आधीच नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या विभागात रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणेशी संबंधित देखभाल आणि दुरुस्तीची कामे या कालावधीत केली जाणार आहेत. या ब्लॉकमुळे एकूण १०९ लोकल फेऱ्या रद्द राहणार असून त्याचा परिणाम हजारो प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही मोठा फटका बसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत अनेक लोकल सेवा रद्द राहणार असल्याने वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे आणि गोरेगावकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागू शकतो.
मध्य रेल्वेकडूनही मुख्य मार्गावर विशेष ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. मध्यरात्रीनंतर ते पहाटेपर्यंत तांत्रिक देखभालीची कामे केली जाणार असल्याने काही सेवांचे वेळापत्रक प्रभावित होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी अधिकृत वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या तांत्रिक यंत्रणांमध्ये झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पश्चिम रेल्वेच्या तिकीट आरक्षण आणि अनारक्षित तिकीट प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक स्थानकांवर तिकीट वितरण सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे तिकीट खरेदीसाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
याचवेळी पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सिग्नल यंत्रणा अचानक बंद पडल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. प्राथमिक तपासात सिग्नल केबलचे नुकसान झाल्याचे समोर आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तांत्रिक पथकांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली होती.
रविवारी होणाऱ्या ब्लॉकमुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांनी अतिरिक्त वेळ हातात ठेवून घराबाहेर पडावे. विशेषतः विमानतळ, कार्यालयीन कामे किंवा लांबच्या प्रवासासाठी जाणाऱ्या नागरिकांनी रेल्वेच्या अद्ययावत सूचनांवर लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे. मुंबईच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल सेवांवरील या ब्लॉकचा परिणाम दिवसभर जाणवण्याची शक्यता आहे.