Thursday, November 13, 2025 08:17:21 AM

मुंबईत मोठा थरार! मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्यचा पोलिसांकडून एन्काऊंटर; गोळीबारात माथेफिरूचा मृत्यू

शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने ही मुले ऑडिशनसाठी स्टुडिओत आली होती. दुपारी जेवणासाठी मुलांना सोडल्यानंतर, आरोपी रोहित आर्य याने त्यांना आणि उपस्थित दोन पालकांना बंद खोलीत कोंडून ठेवले.

मुंबईत मोठा थरार मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्यचा पोलिसांकडून एन्काऊंटर गोळीबारात माथेफिरूचा मृत्यू

मुंबई : राजधानी मुंबईतील पवई परिसरात एका व्यक्तीने 17 शाळकरी मुलांना आणि 2 पालकांना एका खोलीत ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. 'आरए स्टुडिओ' मध्ये ऑडिशनच्या नावाखाली 4-5 दिवसांपासून प्रशिक्षण घेत असलेल्या 15 वर्षांखालील या मुलांना आरोपीने डांबून ठेवले होते. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस आणि NSG कमांडो घटनास्थळी दाखल झाले. रोहित आर्य नावाच्या या आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये रोहित आर्यच्या छातीत गोळी लागली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, ज्यामुळे मुंबईसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय घडला?
शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने ही मुले ऑडिशनसाठी स्टुडिओत आली होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी मुलांना सोडल्यानंतर, आरोपी रोहित आर्य याने त्यांना आणि उपस्थित दोन पालकांना बंद खोलीत कोंडून ओलीस ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावणे दोन वाजता पोलिसांना कॉल आला आणि त्यांनी तात्काळ स्पेशल युनिट्स आणि क्विक ॲक्शन फोर्स (Quick Action Force) बोलावले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित आर्य हा बंदूक घेऊन आतमध्ये बसला होता. पोलिसांनी आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

गोळीबार आणि रेस्क्यू ऑपरेशन
पोलिसांनी वाटाघाटी (Negotiations) सुरू असतानाच, पवई पोलीस अधिकाऱ्यांनी बाथरूममधून आत प्रवेश करण्याची योजना आखली आणि आतील एका व्यक्तीच्या मदतीने सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. एकूण 19 लोकांना (17 मुले, एक प्रौढ आणि एक स्थानिक) ओलीस ठेवले होते. सुटकेच्या वेळी आरोपी रोहित आर्यने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळी झाडली, जी रोहित आर्यच्या छातीत लागली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक ज्येष्ठ नागरिक महिला आणि एक लहान मुलगी जखमी झाली, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - मोठी बातमी! मुंबईतील आर ए स्टुडिओत अभिनयाच्या नावाखाली मुलांना ओलीस ठेवलं; यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य

आरोपी रोहित आर्यच्या मागण्या काय होत्या?
रोहित आर्य याने व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधताना आपण दहशतवादी नसून, आपल्या काही साध्या मागण्या असल्याचे म्हटले होते. एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळे (Economic Loss in project) त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे. शिक्षण विभागासाठी स्वच्छता मॉनिटरचा एक प्रकल्प लोन घेऊन केला होता, पण त्याचे कोटी रुपयांचे थकित पैसे सरकारकडून मिळाले नसल्याने त्याने लक्ष वेधण्यासाठी हा टोकाचा मार्ग अवलंबला होता. 'मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवले आहे, मला संबंधित लोकांशी संवाद साधायचा आहे,' असे त्याने व्हिडिओत म्हटले होते.

पुढील कारवाई आणि प्रतिक्रिया
मुलांची सुटका झाल्यानंतर, त्यांना आणि त्यांच्या पालकांना पवई पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून त्यांचे जबाब (Statement) नोंदवण्याचे काम सुरू आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी पोलिसांनी गुन्हा घडायच्या आधीच तात्काळ कारवाई करून मोठा अनर्थ टाळल्याबद्दल मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांनी पालकांना फसव्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आणि सोसायटी मालकांनी हॉल देताना योग्य नोंदी ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा - Metro vs AC Local: मुंबईमध्ये रंगली नवी चर्चा; प्रवासी म्हणतायेत, मेट्रो 3 पेक्षा आपली एसी लोकल बरी! या चर्चेमागे नेमके कारण काय आहे?


सम्बन्धित सामग्री