Mumbai Local : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बोरिवली ते विरार दरम्यान 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेच्या उभारणीसाठी पश्चिम रेल्वेने आता कंबर कसली आहे. 2184 कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार आहेत. 2028 पर्यंत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून लोकलचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
प्रकल्पाचे मुख्य आकर्षण आणि बदल
स्वतंत्र मार्गिका: 26 किलोमीटरच्या या पट्ट्यात एक्सप्रेस गाड्या आणि लोकल गाड्यांसाठी वेगळे ट्रॅक असतील, ज्यामुळे तांत्रिक अडथळे कमी होतील.
नवे पूल आणि भुयारी मार्ग: या बांधकामात 3 मोठे पूल, 16 छोटे पूल आणि 1 भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. विशेषतः वसई खाडीवरील महत्त्वाच्या 73 आणि 74 क्रमांकाच्या पुलांचे काम वेगाने सुरू आहे.
ऐतिहासिक बदल: भाईंदरजवळील एक जुना ऐतिहासिक पूल पाडून त्या जागी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
कोणत्या स्थानकांचा कायापालट होणार?
रेल्वेच्या या मास्टरप्लॅनमुळे अनेक स्थानकांचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा या स्थानकांवर नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली जाणार असून प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील. नव्या मार्गिका सामावून घेण्यासाठी दहिसरचे फलाट उत्तरेकडे, भाईंदरचे पश्चिमेकडे तर विरारचे फलाट थोडे दक्षिणेकडे सरकवण्यात येणार आहेत. तथापी, भाईंदर आणि वसई या दोन्ही महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्मची पुनर्रचना करून सध्याच्या जागेचा अधिक कार्यक्षम वापर केला जाईल.