Piyush Goyal Rickshaw Ride: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला केंद्रीय मंत्र्यांनी कृतीतून प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल गुरुवारी मुंबईत चक्क रिक्षातून प्रवास करताना दिसले. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाकडे जात असताना त्यांनी खासगी वाहनाचा त्याग करून रिक्षानी प्रवास केला आणि याचा व्हिडिओ आपल्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून शेअर करत नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आवाहन केले.
शताब्दी रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावा
रुग्णालयाला भेट देताना आणि तिथून परततानाही गोयल यांनी रिक्षाचाच वापर केला. शताब्दी रुग्णालयातील कर्करोग उपचार आणि डायलिसिस विभागासाठी प्रगत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. “उत्तर मुंबईतील नागरिकांना उच्च दर्जाची आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणे हे आमचे प्राधान्य आहे. येथील डॉक्टर्स आणि कर्मचारी निष्ठेने काम करत असून, ज्यांना डायलिसिसची गरज आहे, त्यांना ही सेवा पूर्णपणे मोफत मिळावी, हे सुनिश्चित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे गोयल यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
जनसंवाद आणि विकासकामांची पाहणी
रुग्णालय भेटीव्यतिरिक्त पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईतील ‘लोक कल्याण कार्यालया’त आयोजित ‘जन संवाद’ कार्यक्रमात स्थानिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दहणकरवाडी पूल आणि लालजीपाडा येथील नालेसफाईच्या कामांचीही प्रत्यक्ष पाहणी केली. पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये यासाठी त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. तसेच ठाकूर व्हिलेज आणि दहिसर येथील कौशल्य विकास केंद्रांच्या प्रगतीचा आढावा घेऊन सायंकाळी कांदिवलीत शनि जयंती उत्सवात सहभाग दर्शवला.
उत्तर मुंबई में बेहतर स्वास्थ्य सुविधाओं को और मजबूत बनाने की दिशा में निरंतर प्रयासरत ?शताब्दी अस्पताल, कांदिवली pic.twitter.com/YOqQ4iVzEi — Piyush Goyal (@PiyushGoyal) May 16, 2026
राजकीय नेत्यांचा सार्वजनिक वाहतुकीकडे कल
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांनी सार्वजनिक आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला पसंती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इकॉनॉमी क्लास’ आणि दुचाकीवरून प्रवास केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निवड केली आहे. रामदास आठवले, केशव उपाध्ये यांनी मेट्रोचा वापर केला असून संजय उपाध्ये यांनी रेल्वेने प्रवास करून इंधन बचतीचा संदेश दिला आहे. 10 मे रोजी पंतप्रधानांनी जनतेला मेट्रो आणि इतर सार्वजनिक साधनांचा वापर करून परकीय चलन वाचवण्याचे आवाहन केले होते.