मुंबई महापालिकेच्या ‘तिजोरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभागृहातच पर्स उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका व स्थायी समिती सदस्य लक्ष्मी भाटिया यांच्या पर्सची चैन बैठक संपल्यानंतर उघडी आढळल्याने सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून 20 हजारांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. स्थायी समिती सभागृहात चोरीचा हा पहिलाच प्रकार घडला आहे.
हेही वाचा- Anjali Damania: 'चाकणकरांचे खरातला 177 कॉल्स, सर्वाधिक मोठा कॉल 22 मिनिटांचा…'; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
मिळालेल्या माहितीनुसार बैठक संपल्यानंतर भाटिया जेवणासाठी बाहेर गेल्या. त्या परत आल्यावर त्यांना पर्स उघडी दिसली. ज्यामुळे त्यांनी पर्स तपासली तर त्यांच्या पर्समधून 20 हजार रुपये चोरी करण्यात आले होते या व्यतिरिक्त पर्समधील इतर सगळ्या वस्तू जशाच्या तशा पर्समध्ये होत्या. त्यामुळे त्यांनी स्थायी समिती सभागृहात त्यांच्या पर्ससोबत छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त केला. यावेळी सीसीटीव्ही नसल्याने घटनेची खात्री करणे कठीण झाले असले तरी एमएस विभाग, सुरक्षा विभाग व पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. तसेच महापौर, विरोधी पक्ष आणि स्थायी समिती सदस्यांनाही कळवण्यात आले आहे. यावेळी सहकारी नगरसेविकेने पर्सची स्थिती पाहिल्याची नोंद करण्यात आली आहे. स्थायी समिती सभागृहात चोरीचा हा पहिलाच प्रकार घडला असून या प्रकारामुळे पालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
“स्थायी समिती म्हणजे महापालिकेची तिजोरी मानली जाते. याच ठिकाणी असा प्रकार होत असेल, तर सुरक्षेबद्दल काय म्हणायचं?” असा संतप्त सवाल लक्ष्मी भाटिया यांनी उपस्थित केला. दरम्यान, मनसे गटप्रमुख यशवंत किल्लेदार यांनीही या घटनेवरून पालिकेला खडेबोल सुनावत, “सभागृहातच सुरक्षेची अवस्था अशी असेल, तर सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय?” असा टोला लगावला आहे.