Maharashtra New DGP: महाराष्ट्राला आज नवे पोलीस महासंचालक (डीजीपी) मिळाले आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते महाराष्ट्राचे पुढील डीजीपी म्हणून नियुक्त होणार असून ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत या पदावर कार्यभार सांभाळतील. विद्यमान डीजीपी रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी दाते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक म्हणून काम पाहत आहेत. दाते हे महाराष्ट्र कॅडरचे 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी असून गेल्या वर्षी 27 मार्चला त्यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या या महत्त्वाच्या केंद्रीय संस्थेचे नेतृत्व त्यांनी अत्यंत जबाबदारीने केले आहे.
सदानंद दाते कोण आहेत?
पुण्यात वृत्तपत्रे विकून आपले शिक्षण पूर्ण करणारे सदानंद दाते आज देशातील सर्वात कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या रात्री ते मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून तैनात होते. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील गोळीबारानंतर त्यांनी पथकासह कसाब आणि इस्माईलचा पाठलाग केला. कामा हॉस्पिटल परिसरात या दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात दाते जखमी झाले. हात-पायावर गंभीर स्प्लिंटर लागूनही त्यांनी धैर्याने प्रतिकार केला.
हेही वाचा – Ajit Pawar: पर्यावरण वाचलं तरच… 'तपोवन' प्रकरणी अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुतीत वादाचा खडा
जखमी असूनही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची अचूक माहिती देत दहशतवाद्यांना बराच वेळ गुंतवून ठेवले. त्यांच्या या कृतीमुळे हॉस्पिटलमधील अनेक नागरिकांचे प्राण वाचले. शेवटी जास्त रक्तस्त्रावामुळे ते बेशुद्ध पडले. त्या रात्री मुंबई पोलिसांच्या 18 जणांनी आपले प्राण गमावले होते, ज्यात हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. दाते यांनी पुणे विद्यापीठातून एम.कॉम आणि आर्थिक गुन्ह्यांवरील डॉक्टरेट प्राप्त केली आहे. कर्तव्यदक्ष, धाडसी आणि स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
हेही वाचा – Shital Tejwani Arrest: पुणे जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानीला अटक
सदानंद दाते यांची डीजीपीपदी नियुक्ती ही महाराष्ट्र पोलीस दलासाठी एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे. 26/11 सारख्या संवेदनशील परिस्थितीत दाखवलेले धैर्य, केंद्रीय संस्थांमधील कामाचा विशाल अनुभव आणि संघटन कौशल्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला मोठी बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.