नवी मुंबई आणि उरण परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उरण ते नवी मुंबई लोकल सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, सोमवारीपासून या मार्गावर 10 नव्या लोकल फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेली तारघर आणि गव्हाण ही दोन नवी रेल्वे स्थानकेही अखेर कार्यन्वित झाली आहेत. या निर्णयामुळे मुंबईकर आणि नवी मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, जलद आणि आरामदायी होणार आहे.
2024 मध्ये उरण ते नवी मुंबई दरम्यान लोकल सेवा सुरू झाली होती. मात्र, या मार्गावरील काही स्थानकांची कामे अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी रेल्वेचा थांबा देण्यात आला नव्हता. आता तारघर आणि गव्हाण ही दोन्ही स्थानके सुरू झाल्याने या मार्गावरील रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळाली आहे. दररोज सुमारे 14 ते 15 हजार प्रवासी या मार्गावरून ये-जा करतात. पहाटे लवकर आणि रात्री उशिरा लोकल सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती, त्याला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा: BMC Election 2025: मुंबईत सिंगल वोट, इतर महापालिकांत मल्टी वोट; मतदानापूर्वी जाणून घ्या
नव्या वेळापत्रकानुसार उरण आणि बेलापूर येथून पहिली लोकल सकाळी 5.30 वाजता सुटणार असून, शेवटची लोकल रात्री 10.30 वाजता धावणार आहे. बेलापूर स्थानकावरून पहिली लोकल सकाळी 5.45 वाजता, तर शेवटची लोकल रात्री 10.15 वाजता सुटेल. नेरूळ स्थानकावरून सकाळी 6.05 वाजता पहिली लोकल उपलब्ध होईल, तर शेवटची लोकल रात्री 9.30 वाजता सुटणार आहे.
या वेळापत्रकामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे तारघर रेल्वे स्थानक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्यामुळे विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांनाही रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे. तसेच गव्हाण स्थानक सुरू झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.
या वाढीव लोकल फेऱ्यांमुळे उरण ते नवी मुंबई मार्गावरील लोकल सेवांची एकूण संख्या आता 50 एवढी झाली आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनेल. रेल्वेच्या या सकारात्मक निर्णयामुळे नवी मुंबई आणि मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात गती येणार असून, हे खऱ्या अर्थाने प्रवाशांसाठी मोठी आनंदाची गोष्ट ठरली आहे.