कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या नगरीत म्हणजेच कोल्हापुरात आजपासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
घटस्थापना आणि पुढील नियोजन
आज सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी तोफेच्या सलामीने अंबाबाईच्या मंदिरात घटस्थापना झाली आहे. त्यानंतर देवीचे दर्शन सुरू झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर नगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी विशेष तयारी केली आहे.
‘या’ उपक्रमामुळे कुठेही मिळेल दर्शन
नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक कोल्हापूरला येतात. यातील अनेक भाविकांना अंबाबाई मंदिरापर्यंत जाणे आणि दर्शनाच्या रांगेत तासनतास उभे राहणे शक्य नसते. ही अडचण लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, शहरात 15 ठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. या स्क्रीन्सवर देवीच्या पूजेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, ज्यामुळे भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना ते जिथे असतील तिथे देवीचे दर्शन घेता येईल.
या विशेष उपक्रमामुळे मंदिरात गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचे भाविकांनी स्वागत केले आहे.
या ठिकाणी लागणार स्क्रीन
अंबाबाई मंदिर परिसरात 3, शेतकरी बझार दर्शन मंडपामध्ये 3, पूर्व दरवाजासमोरील दर्शन रांगांमध्ये 2, घाटी दरवाजा, बिनखांबी गणेश मंदिर, जोतिबा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंगावेश, मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, खासबाग खाऊ गल्ली रेणुका मंदिर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, त्र्यंबोली मंदिर, जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिर इत्यादी ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली
120 पीटीझेड, आयपी कॅमेरा, 5 डोअर मेटल डिटेक्टर, 5 एचएचएमडी, 15 वॉकी टॉकी, 3 एक्स-रे बॅगेज स्कॅनर, 1 ड्रोन कॅमेरा, 4 फिक्स एलईडी स्क्रीन, सोशल मीडिया लाईव्ह, पालखी दर्शन, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, सीसीटीव्हींना एआयची जोड, अशा अत्याधुनिक साधनांच्या मदतीने अंबाबाई मंदिरावर लक्ष ठेवलं जाणार आहे.