शक्तीची उपासना, साधना आणि जागराचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. देवीच्या विविध रूपांची आराधना करत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवसांच्या या उत्सवात देवीच्या शक्तिरूपांची पूजा केली जाते. यंदा पंचांगातील काही वैशिष्ट्यपूर्ण तिथी-संयोगामुळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 11 ऑक्टोबरला घटस्थापनेने नवरात्राला प्रारंभ होणार असून 19 ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीचे पूजन एकाच दिवशी होणार आहे. त्यानंतर 20 ऑक्टोबरला विजयादशमी साजरी होईल. त्यामुळे यंदाच्या नवरात्रात तिथींच्या क्रमात विशेष बदल जाणवणार आहे.
नवरात्रीची प्रतिपदा तिथी 10 ऑक्टोबरच्या रात्री 9.19 वाजता सुरू होऊन 11 ऑक्टोबरच्या रात्री 9.30 वाजता संपणार आहे. त्यामुळे घटस्थापना 11 ऑक्टोबरलाच केली जाणार आहे. घटस्थापनेसाठी सकाळचा मुहूर्त सुमारे 6.31 ते 10.27 असा दिला आहे.
यंदाच्या नवरात्र उत्सवात सप्तमी तिथी दोन दिवस व्यापणार असून 17 व 18 ऑक्टोबरला सप्तमीचे आचरण आहे. 19 ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमी एकत्र येणार आहेत. या दिवशी दुर्गाष्टमीची पूजा, संधीपूजा, महागौरी-सिद्धिदात्री आराधना, हवन, कन्यापूजन आदी धार्मिक विधींना विशेष महत्त्व राहणार आहे.
हेही वाचा – नवरात्रौत्सवात अशी करा देवीसमोर घटस्थापना; जाणून घ्या महत्त्व आणि योग्य विधी
घटस्थापनेपासून अखंड दीप, दुर्गासप्तशती किंवा देवीभागवताचे पठण, देवीस्तोत्र, नामस्मरण, उपवास, जप, होमहवन आणि जागरण अशा साधना केल्या जातात. शक्तीच्या विविध रूपांची उपासना करताना प्रतिपदेचा संकल्प, सप्तमीची विशेष आराधना, अष्टमीची दुर्गापूजा आणि नवमीचे हवन-कन्यापूजन यांना विशेष स्थान आहे.
अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी का आली?
पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित असते. एक तिथी साधारण 19 ते 24 तासांची असते. यंदा अष्टमी तिथी 19 ऑक्टोबरला पहाटे सुरू होऊन त्याच दिवशी दुपारी 12 वाजेनंतर संपत आहे आणि त्याच क्षणापासून नवमी तिथी सुरू होत आहे. म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी अष्टमी असली तरी दुपारनंतर नवमी लागत असल्याने शास्त्रानुसार दोन्ही तिथींचे पूजन, हवन आणि कन्यापूजन एकाच दिवशी 19 ऑक्टोबरला करावे लागणार आहे. यालाच तिथीचा क्षय किंवा एकत्र येणे असे म्हणतात.
महत्त्वाच्या तारखा
11 ऑक्टोबर – घटस्थापना, नवरात्र प्रारंभ
16 ऑक्टोबर – षष्ठी, सरस्वती आवाहन
17-18 ऑक्टोबर – सप्तमी तिथीचा विस्तार
19 ऑक्टोबर – दुर्गाष्टमी व महानवमी, संधीपूजेला विशेष महत्त्व
20 ऑक्टोबर – विजयादशमी, दसरा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.