मुंबई: उन्हाळा सुरू होताच बाजारात खरबूज आणि टरबूज विक्री मोठ्या प्रमाणात दिसू लागते. शरीराला थंडावा देणारी हि दोन्ही फळे लोकांना ताजेतवाने राहण्यास मदत करतात. खरबूज केवळ चवीला चांगले नसून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. खरबूजामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत असल्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.
अनेक लोक खरबूज खाताना त्याच्या बियांना कचरा समजून फेकून देतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की, पण याच बिया बाजारात प्रति किलो 3,000 रुपयांपर्यंत विकल्या जातात? खरबूजाच्या बियांमध्येही अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
खरबूजाच्या बियांचे आरोग्यदायी फायदे
खरबूजाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेला फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून वाचवतात. याशिवाय या बिया थंड असतात, त्यामुळे त्यांचा वापर ठंडाई तयार करताना केला जातो. फायबरयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठीही या बिया उपयुक्त ठरतात.
हेही वाचा :वरूथिनी एकादशी 2025: एकादशी कधी आहे? जाणून घ्या व्रताची वेळ, तिथी, पूजा विधी आणि महत्त्व
घरी बिया कशा साठवाव्यात?
खरबूज खाल्ल्यानंतर त्यातील बिया एका वेगळ्या डब्यात गोळा करा. 4-5 खरबुजांच्या बिया जमा झाल्यावर त्या बियांना स्वच्छ पाण्यात घासून धुवा. नंतर त्यांना चाळणीमध्ये ठेवून चांगले कोरडे करा. पूर्णपणे वाळल्यावर बिया साठवण्यासाठी एखाद्या हवाबंद डब्याचा वापर करा. जर या बिया फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या दीर्घकाळ टिकू शकतात.
खरबूजाच्या बियांचा वापर कसा करावा?
मेलन सीड्स खाण्यात अतिशय चविष्ट लागतात. सकाळच्या न्याहारीत 1 चमचा बिया खाल्ल्या तरी चालतात. तुम्ही या बिया दह्यात, स्मूदीत किंवा कोशिंबिरीत घालू शकता. आटेचे लाडू, गाजराचा हलवा, बर्फी यामध्येही या बिया स्वाद वाढवतात. विशेषतः खरबूज आणि नारळाची बर्फी तर चवीला खूपच छान लागते.
जेव्हा पुढच्यावेळी तुम्ही खरबूज खाणार असाल, तेव्हा त्याच्या बियांना कचरा समजू नका. त्या गोळा करा, स्वच्छ करा आणि योग्य पद्धतीने साठवा. आरोग्यदायी फायदे घेण्यासोबतच त्या विकून आर्थिक फायदाही कमावता येऊ शकतो. खरबूजाच्या बिया म्हणजे एक दुर्लक्षित खजिना आहे.