राज्यभराचे लक्ष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीकडे
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी आज केज न्यायालयात होणार आहे. या खटल्याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तीन महिन्यांपूर्वी, 9 डिसेंबर 2024 रोजी, संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.
संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ माजली असून, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, अद्याप अनेक बाबी समोर यायच्या आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव हा खटला बीड न्यायालयात चालवावा, अशी विनंती एसआयटीने केली होती. मात्र, पहिली सुनावणी केज न्यायालयातच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुढील सुनावण्या बीड न्यायालयात होतील की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
या प्रकरणातील आरोपींविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह समर्थक करत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.