Revenue Department: राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दैनंदिन कामकाजाला अधिक गती देण्यासाठी आणि नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महसूल विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तब्बल 160 ‘दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक’ (अराजपत्रित गट-ब) अधिकाऱ्यांना ‘सह जिल्हा निबंधक, वर्ग-2’ व ‘मुद्रांक उपअधीक्षक’ पदांवर पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश महसूल विभागाने नुकतेच प्रसिद्ध केले आहेत.
हेही वाचा – Cabinet Decisions: 5 नवीन न्यायालये अन् शेतीत AI चा वापर… मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 8 मोठे निर्णय
विभागाच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदोन्नती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकारातून हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांची पदोन्नती होण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे. यामध्ये विभागनिहाय पाहता कोकण विभागातील सर्वाधिक 59, पुणे विभागातील 42, नागपूर विभागातील 19, छत्रपती संभाजीनगरमधील 15, नाशिकमधील 14 आणि अमरावती विभागातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नागरिकांना मिळणार पारदर्शक व गतिमान सेवा
मालमत्ता खरेदी-विक्री, विविध कायदेशीर करार आणि दस्त नोंदणीसाठी नागरिकांचा या विभागाशी दररोज थेट संबंध येतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरल्यामुळे नोंदणी प्रक्रियेतील अडथळे दूर होऊन कामांमध्ये पारदर्शकता येईल. या पदोन्नतीमुळे खाली रिक्त झालेल्या पदांवरही तातडीने पुढील पदोन्नती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण प्रशासकीय साखळी अधिक मजबूत होईल.