BMC Election Results: आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईच्या सत्तेचा पेच यंदा एका दमात सुटणार नाही. उद्या, 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानानंतर, 16 जानेवारी रोजी होणारी मतमोजणी प्रशासनाने '5 टप्प्यांच्या फॉर्म्युल्यात' बसवली आहे. त्यामुळे निकालाचा अधिकृत गुलाल उधळण्यासाठी यंदा कार्यकर्त्यांना संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
यंदा नेमका बदल काय?
2017 च्या निवडणुकीत सर्व प्रभागांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाले होते, कारण तेव्हा बहुतांश वॉर्डांची मोजणी समांतर सुरू होती. मात्र, यंदा निवडणूक आयोगाने रणनीती बदलली आहे:
मर्यादित मोजणी: एका मतमोजणी केंद्रावर एका वेळी फक्त 2 च वॉर्डांची मोजणी केली जाईल.
एकूण क्षमता: मुंबईतील 23 केंद्रांवर मिळून एका वेळी केवळ 46 प्रभागांचे कल समोर येतील.
अचूकतेवर भर: मनुष्यबळाचा ताण कमी करण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – BMC Municipal Elections 2026 : मुंबईतील महापालिका प्रभागांमध्ये मुसलमानबहुल! राजकारणावर याचा काय परिणाम?
निकालाचे संभाव्य वेळापत्रक
मोजणी टप्प्याटप्प्याने होणार असल्याने, सर्व 227 वॉर्डांचे चित्र स्पष्ट व्हायला 5 फेऱ्यांची प्रतीक्षा करावी लागेल.
पहिली फेरी (सकाळी 10 ते 12): पहिल्या 46 वॉर्डांचे निकाल.
दुपारची सत्रे: टप्प्याटप्प्याने पुढील प्रभागांची मोजणी.
अंतिम निकाल: संध्याकाळी उशिरापर्यंत संपूर्ण मुंबईचे चित्र स्पष्ट होईल.
राजकीय धाकधूक वाढली
या नव्या पद्धतीमुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. ज्यांचे नाव पहिल्या 2 टप्प्यात नाही, त्यांना आपल्या भविष्यासाठी दुपारपर्यंत 'वेटिंग'वर राहावे लागणार आहे. एका केंद्रावर 10 वॉर्डांची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना आता एका वेळी 2 च वॉर्डांवर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याने, प्रक्रियेत कोणतीही घाई होणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.