महेद्र जोईल .प्रतिनिधी. मुंबई: महाराष्ट्र सरकारने 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महिलांनी लाखो अर्ज केले होते. मात्र, लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर अनेक महिला अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती उघडकीस आली. ही माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारने या महिलांचे अर्ज बाद केले होते. अशातच, लाडकी बहीण योजनेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
माहितीनुसार, 2 हजार 652 लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी झाल्या आहेत आणि 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल झाली आहे. तसेच, आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे. महिला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारींनंतर, 1 लाख 60 हजार 559 महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या चौकशीत 2 हजार 652 महिला कर्मचाऱ्यांनी योजनेतून पैसे उकळल्याचे उघड झाले. सामान्य प्रशासन विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला 1 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा UID डेटा उपलब्ध करून दिला होता. या कर्मचाऱ्यांची नावे सेवा प्रणालीवर नोंदवण्यात आली होती.
यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे हे तपासण्यासाठी एक मोहीम हाती घेण्यात आली. त्यात 2 हजार 652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 या 9 महिन्यांत त्यांनी प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशाच प्रकारे आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची चाचणी घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
8 लाख 85 हजार महिलांनी घेतला दोन योजनांचा लाभ:
नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांमधून 8 लाख 85 हजार महिलांनी आर्थिक लाभ घेतल्याचे तपासात आढळले आहे. लाडकी बहीण योजनेतून त्यांनी महिन्याकाठी 1500 रुपये उचलले. त्याचवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेत प्रत्येकी सहा हजार (एकूण 12 हजार रु.) घेतले होते. याचा अर्थ वर्षाकाठी त्यांना 30 हजार रुपये मिळाले होते.
शासकीय योजनांचा डबल लाभ घेतलेल्या महिलांची संख्या:
धुळे - 13 हजार 020
नंदुरबार - 7 हजार 808
जळगाव - 40 हजार 777
बुलढाणा - 25 हजार 716
अमरावती -19 हजार 985
नागपूर - 16 हजार 421
भंडारा - 23 हजार 671
पालघर - 9 हजार 807
नाशिक - 34 हजार 588
अकोला - 16 हजार 861
गोंदिया - 29 हजार 443
मुंबई उपनगर - 8 हजार 288
ठाणे - 14 हजार 507
छ. संभाजीनगर - 32 हजार 293
अहिल्यानगर - 50 हजार 617
बीड - 26 हजार 672
चंद्रपूर - 20 हजार 300
यवतमाळ - 24 हजार 675
वर्धा - 8 हजार 643
गडचिरोली - (माहिती नाही)
वाशिम - (माहिती नाही)
मुंबई - 2 हजार 222
पुणे - 52 हजार 052
सातारा - 36 हजार 533
सोलापूर - 41 हजार 415
हिंगोली - (माहिती नाही)
जालना - 27 हजार 600
रायगड - 9 हजार 183
नांदेड - 37 हजार 659
परभणी - 25 हजार 057
रत्नागिरी - 10 हजार 566
सांगली - 35 हजार 306
सिंधुदुर्ग - 9 हजार 824
कोल्हापूर - 38 हजार 811
लातूर - 19 हजार 181
धाराशिव - 15 हजार 124