ED Raid In Nagpur: राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी अवघे 6 दिवस शिल्लक असतानाच, नागपूरमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर ईडीने धाड टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या कारवाईमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
रेती तस्करीचे जुने प्रकरण पुन्हा चर्चेत
ही कारवाई 2021 मध्ये मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात झालेल्या रेती तस्करी आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित असल्याचे समजते. नागपूर आणि दिल्ली येथील ईडीच्या सुमारे 10 पथकांनी शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात एकाच वेळी छापेमारी सुरू केली.
कोणाकोणावर कारवाई?
उत्तम कापसे यांच्यासह त्यांचे बंधू प्रफुल्ल कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते, शरद रॉय आणि मनोज गायकवाड यांच्या मालमत्तांचीही झडती घेण्यात येत आहे. राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशा वेळी ऐन मतदानापूर्वीच जिल्हाध्यक्षांना लक्ष्य केल्याने ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे मतदारांमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा – Eknath Shinde : अजित पवारांच्या पुण्यात एकनाथ शिंदे कडाडले; लाडकी बहीण योजनेबाबत केलं मोठं वक्तव्य
ठाकरे गटाची चिंता वाढली
उत्तम कापसे हे नागपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे महत्त्वाचे स्तंभ मानले जातात. निवडणुकीच्या नियोजनात ते व्यस्त असतानाच ईडीचा ताफा त्यांच्या दारी पोहोचल्याने प्रचाराच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या छापेमारीत नेमकी काय कागदपत्रे किंवा रोकड हाती लागते, यावर कापसे यांचे आणि पर्यायाने पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.