PM Modi Post: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरणात मोठा भूकंप आला आहे. या घडामोडीनंतर लगेचच, जंतरमंतरवर गेल्या 1 महिनाभरापेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आपले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या या निर्णयावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून, भाजपने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे, विरोधी पक्षांनी आणि आंदोलकांनी या राजीनाम्याला विद्यार्थ्यांच्या ऐक्याचा ऐतिहासिक विजय मानला आहे.
राजकीय वादळात पंतप्रधान मोदींची ‘सारनाथ’बाबत विशेष पोस्ट
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर केलेली पहिली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये राजकीय घडामोडींचा उल्लेख न करता, देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एका मोठ्या जागतिक सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे. युनेस्कोने (UNESCO) भारतातील प्राचीन बौद्ध स्थळ ‘सारनाथ’चा समावेश ‘जागतिक वारसा स्थळ’ (World Heritage Site) म्हणून केल्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधानांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
A proud moment for every Indian! Delighted that Sarnath in Uttar Pradesh has been inscribed on the UNESCO World Heritage List. Sarnath has a close association with Lord Buddha, whose timeless message of wisdom, compassion and harmony inspires the world. This recognition… https://t.co/KkdMOg6g0d — Narendra Modi (@narendramodi) July 25, 2026
प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण; पंतप्रधानांकडून गौरव
युनेस्कोच्या अधिकृत घोषणेनंतर पंतप्रधान मोदींनी लिहिले की, उत्तर प्रदेशातील सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणे हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. भगवान बुद्धांचे ज्ञान, करुणा आणि शांततेचा संदेश जगाला प्रेरणा देतो. या मान्यतेमुळे भारताच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. यामुळे भविष्यात जगभरातून असंख्य पर्यटक आणि श्रद्धाळू सारनाथला भेट देऊन भगवान बुद्धांच्या विचारांशी जोडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सारनाथचे जागतिक आणि आध्यात्मिक महत्त्व
उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरापासून अवघ्या 10 किलो अंतरावर वसलेले सारनाथ हे बौद्ध धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान आहे. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी आपले पहिले धर्मोपदेश याच पवित्र भूमीत दिले होते. त्यामुळे जागतिक इतिहासात आणि बौद्ध तत्त्वज्ञानात या ठिकाणाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजप पक्षश्रेष्ठींचा धर्मेंद्र प्रधान यांना पाठिंबा
दुसरीकडे, राजकीय पातळीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी धर्मेंद्र प्रधान यांची खंबीरपणे बाजू सांभाळली आहे. भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) अंमलबजावणी आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करत, प्रधान यांनी देश आणि पक्षाचे व्यापक हित लक्षात घेऊनच हा राजीनामा देण्याचा धाडसी निर्णय घेतला असल्याचे नितीन नवीन यांनी सांगितले.