AAP Seeks Disqualification of 7 Rebel MPs : आम आदमी पार्टीच्या 10 पैकी 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या फुटीला 'बेकायदेशीर' ठरवत 'आप'ने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सातही खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी पक्षाने राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपतींकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार ही फूट घटनाबाह्य असल्याचा दावा 'आप'ने केला असून, संसदेत यावर मोठी कायदेशीर लढाई होण्याची चिन्हे आहेत.
'शिवसेना' प्रकरणाचा संदर्भ आणि तांत्रिक पेच
'आप'चे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. संविधानातील 10 व्या अनुसूचीचा दाखला देत ते म्हणाले की, दोन-तृतीयांश बहुमत असले तरी आता कोणत्याही फुटीला कायदेशीर संरक्षण मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, ही संख्या जरी 8 वर पोहोचली, तरी हे पक्षांतर बेकायदेशीरच ठरेल. राघव चड्ढा, स्वाती मालीवाल आणि हरभजन सिंह यांच्यासह इतर 4 खासदारांनी लोकशाहीची थट्टा उडवल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
हेही वाचा – Harbhajan Singh: भाजपमध्ये प्रवेश करताच घरावर लिहले'पंजाबचा गद्दार'; हरभजन सिंगचे टेंशन वाढणार
'श्रीमंत नेते भीतीने पळाले' – आपचा टोला
दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी पक्षाची भूमिका मांडताना भाजपच्या केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला. "सध्या पक्षासाठी कठीण काळ असून ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून केवळ श्रीमंत नेतेच पक्ष सोडून जात आहेत," अशी टीका त्यांनी केली. पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर उभा असून, प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकून किंवा कार्यालय काढून घेऊन आमचा आवाज दाबता येणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या संकटकाळातही निष्ठावान कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपचा पलटवार आणि पक्षात 'गुदमरणारे' वातावरण असल्याचा दावा
दुसरीकडे, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी 'आप'चे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सचदेवा यांच्या मते, अरविंद केजरीवाल यांच्या आर्थिक अनियमिततांची माहिती असल्यानेच राघव चड्ढा आणि इतर प्रतिष्ठित खासदारांनी पक्ष सोडला आहे. 'आप'मध्ये सुशिक्षित नेत्यांची घुसमट होत होती, म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना धमकावून गप्प करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला असून, याच कारणांमुळे हे खासदार स्वेच्छेने बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले.