Wednesday, July 09, 2025 09:47:46 PM

'मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं?'; आदित्य ठाकरेंचा सवाल

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केले की, 'हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच राहिल'. तसेच, 'मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं?', असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई: राज्याने पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा विषय सक्तीचा केला आहे आणि राज्य सरकारने हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मनसेने या सरकारच्या निर्णयाला स्पष्टपणे विरोध केला आहे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यानंतर, या निर्णयावर इतर राजकीय पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अशातच, आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून स्पष्ट केले की, 'हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच राहिल'. तसेच, 'मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं?', असा सवालही यादरम्यान आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरेंची 'एक्स' पोस्ट:

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दुपारी 3:16 वाजता एक्सवर पोस्ट केले की, 'कुठल्याही भाषेला विरोध नाही. पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच! त्याविरुद्ध आंदोलन सुरू असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना, आपण लक्षात येतंय का की मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपाचं काय चाललंय?'.

पुढे, आदित्य ठाकरे म्हणाले की, 'गिरगाव चौपाटी येथे उद्धवसाहेबांनी मुंबईत सुरू केलेलं 'मराठी रंगभूमी दालन' गुपचूप रद्द करायचं, तिसरीकडे मराठी भाषा भवनात इतर कार्यालयं घुसवून त्याचं महत्व कमी करायचं आणि त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करून घोंगडं भिजवत ठेवायचं! हे सगळं कशासाठी करतंय भाजपा? गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल? स्थानिकांचा तर नव्हता, मग स्थानिक भाजपा आमदाराने केला का? की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? ह्याचं उत्तर महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा देणार का? आणि ह्यांचा हा खेळ आपण मुंबईकर वेळेत ओळखणार का?'.


सम्बन्धित सामग्री