पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील प्रचाराचा मोर्चा हाती घेतला आहे. काल पिंपरी चिंचवड येथे झालेल्या वादग्रस्त पत्रकार परिषदेनंतर आज, शनिवारी अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेतही विरोधकांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील विकासकामांबाबत सत्ताधाऱ्यांना लक्ष केले असून माझ्या हातात या पालिकांचा कारभार द्या, असे आवाहन पुणेकरांना केले आहे. दरम्यान, येथील महापालिकांचा त्रिकुट कारभारी बदलायला हवा, असेही त्यांनी यावेळी म्हटले. अजित पवारांच्या या सूचक वक्यव्यामुळे हे त्रिकुट कोणते, असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महापालिकांमधील पाणी, रस्ते, वाहतुक, सोयी-सुविधा यांचा पाढा वाचून दाखवला. येथील सत्ताधाऱ्यांनी विकासकामांना प्राधान्य न देता पुण्याचा विकास कसा रोखून ठेवला आहे, हे सांगितले. तसेच मला संधी दिली तर मी हे बदलून दाखवेन, असे आश्वासनही पुणेकरांना त्यांनी दिले. मात्र पुण्याची दुर्दशा करणारे ते त्रिकुट कोण, याचा उलगडा अजित पवारांनी केला नाही. पत्रकारांनी विचारले असता, तुम्हीच शोधून काढा असे ते म्हणाले. त्यामुळे अजित पवारांनी नाव न घेता कोणाला त्रिकुट म्हटले आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. हे त्रिकुट उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे तर नाही ना, असाही कयास लावला जात आहे.