Sanjay Raut On NCP : महायुती सरकारमधील भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील अंतर्गत धुसफूस आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद आणि नाराजी नाट्य दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केला असून, “हा पक्ष भविष्यात टिकणार नाही,” असा मोठा दावा केला आहे. या राजकीय संघर्षामुळे राज्यातील सत्ताधारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
छगन भुजबळांची नाराजी आणि वादाचे नवे कारण
काही दिवसांपूर्वी केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यापुरता मर्यादित असलेला पक्षांतर्गत वाद आता थेट ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यापर्यंत पोहोचला आहे. एका विशिष्ट कंत्राटदाराला काम देण्यावरून पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात तीव्र मतभेद झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर नाराजी व्यक्त करताना छगन भुजबळ यांनी, “जेव्हा पक्षात शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते, तेव्हा असे प्रकार कधीच घडत नव्हते, जे आता अनुभवावे लागत आहेत,” अशा शब्दांत आपली खंत बोलून दाखवली. या घटनेमुळे अजित पवार गटातील अंतर्गत समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘त्या चौकडीला आता पश्चाताप होत असेल’; संजय राऊत
राष्ट्रवादीतील या यादवीवर बोलताना संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टोलेबाजी केली. राऊत यांनी पुनरुच्चार केला की, अजित पवारांनी वेगळी चूल मांडून उभा केलेला हा पक्ष येत्या काळात पूर्णपणे संपुष्टात येईल. ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे या नेत्यांना आता आपल्या निर्णयाचा प्रचंड पश्चाताप होत असेल. “आपण उगीचच अजित पवारांचे कान भरले, त्यांना शरद पवारांपासून दूर केले आणि पक्षाला भाजपच्या दावणीला बांधले,” अशी भावना आता या सर्व नेत्यांच्या मनात निर्माण झाली असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला.
आम्ही केवळ मूकप्रेक्षक
सत्ताधाऱ्यांमधील या वादावर बोलताना संजय राऊत यांनी विरोधी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “आम्ही केवळ मूकप्रेक्षक असून सत्ताधाऱ्यांमधील हा तमाशा पाहत राहणे हेच सध्या आमचे काम आहे,” असे मिश्किल स्पष्टीकरण त्यांनी दिले. या सर्व घडामोडींमुळे अजित पवार गटातील गटबाजी आता उघड झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर याचे काय पडसाद उमटतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.