बारामती: राज्याच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व 'अजित पवार' नावाच्या वादळाच्या अकाली जाण्याने कायमचं शांत झालं आहे. बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महत्वाच्या नेत्याला गमावल्याच्या भावनेने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असतानाच, आता या अपघाताभोवती संशयाचे दाट धुके जमा होऊ लागले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांसह राजकीय वर्तुळातून या घटनेकडे केवळ अपघात म्हणून न पाहता, त्यामागे काही कट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
या अपघातातील मृतांच्या आकड्यावरून सध्या सर्वात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरुवातीला विमानात सहा प्रवासी असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात पाचच मृतदेह हाती लागल्याने संशयाची सुई अधिक टोकदार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर तीव्र आक्षेप घेत, "जर प्रवासी सहा होते, तर पाचच मृतदेह कसे सापडले?" असा सवाल उपस्थित केला. मिटकरी यांनी सोशल मीडियावर अत्यंत आक्रमक भाषेत भावना व्यक्त करताना याला 'घातपात' संबोधले असून, "ज्यांनी हा देवमाणूस हिरावला, त्यांच्या घरात भविष्यात कोणी शिल्लक उरणार नाही," असा इशाराही दिला आहे.
या सर्व खळबळजनक चर्चांवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि भाजपचे राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी आज त्यांची कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ भूमिका मांडली. निकम म्हणाले की, "भावनेच्या भरात आपण या घटनेला विनाकारण वेगळी कलाटणी देत आहोत. सदर विमानात सहा प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा अद्याप समोर आलेला नाही. विमान अपघातात इंधनाचा मोठ्या प्रमाणावर स्फोट झाला, ज्यामुळे मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे झाली आहे. पुराव्याशिवाय संशय व्यक्त करणे तपासाच्या दृष्टीने चुकीचे ठरेल."
हेही वाचा: Gold-Silver Rate Today : अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
निकम यांनी पुढे स्पष्ट केले की, कायद्याच्या चौकटीत 'कट' (Conspiracy) सिद्ध करण्यासाठी प्राथमिक पुराव्यांची आवश्यकता असते. केवळ तर्क-वितर्कांच्या जोरावर एखाद्या अपघाताला गुन्ह्याचे स्वरूप देता येत नाही.
मात्र, मिटकरी यांच्यासह संजय राऊत यांनीही या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. राऊत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत, हा केवळ तांत्रिक बिघाड नसून यामागे मोठे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता वर्तवली आहे.
एकीकडे बारामतीसह संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेली असताना, दुसरीकडे या मृत्यूचे गूढ वाढू लागले आहे. अजित पवारांसारख्या अनुभवी आणि कणखर नेत्याचे असे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहेच, पण आता या प्रकरणातील 'सहाव्या' प्रवाशाचे रहस्य आणि घातपाताचे आरोप यामुळे तपास यंत्रणांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. न्यायाची प्रतीक्षा आणि महत्वाच्या नेत्याची निधनाने निर्माण झालेली उणीव अशा दुहेरी कात्रीत महाराष्ट्र आज उभा आहे. प्रशासनाकडून लवकरच या अपघाताचा सविस्तर अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Sanjay Raut: ' अजित पवार यांना भाजपाकडून वारंवार धमक्या ... ' संजय राऊत यांचा भाजपावर आरोप