Uddhav Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-फडणवीस एकत्र येण्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने संबंधित मतदारसंघांमध्ये भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आज 3 रा दिवस असून शिर्डी येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-फडणवीस एकत्र येण्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

मुंबई: शिवसेना (UBT) पक्षातील 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने संबंधित मतदारसंघांमध्ये भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आज 3 रा दिवस असून शिर्डी येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान 'देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का?' या राजकीय वर्तुळात रंगलेल्या सर्वात मोठ्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे म्हणाले की, 'मी आणि देवेंद्र फडणवीस दोन वेगवेगळ्या टोकांना गेल्यामुळे मध्यंतरीचे लोक जो गोंधळ घालत आहेत, तो कदाचित त्यांच्या (फडणवीस यांच्या) लक्षात येत नाहीये.'

पुढाकार घेण्याचा प्रश्नच नाही, 'ऊपरवाले की मर्जी'…
फडणवीस यांच्यासोबत पुन्हा येण्यासाठी तुम्ही स्वतः काही पुढाकार घेणार का, असे विचारले असता ठाकरे यांनी चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला. ते म्हणाले, 'तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मी तर त्यांचा हितचिंतकच आहे. मी केवळ फडणवीस यांच्या मनातील भावना बोलून दाखवत आहे. माझ्या बाजूने पुढाकार घेण्यासारखे काही नाही, आता सर्व काही 'ऊपरवाले की मर्जी'वर अवलंबून आहे.' या विधानामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरेंमध्ये पडद्यामागे काही हालचाली होणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

फडणवीसांच्या पंतप्रधानपदाच्या इच्छेवर आणि भाजपमधील अंतर्गत राजकारणावर भाष्य
'देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केल्यास शिवसेना त्यांना पाठिंबा देणार का?' या प्रश्नावर बोलताना ठाकरे यांनी भाजपच्या दिल्लीतील राजकारणावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'सध्याच्या स्थितीत फडणवीस यांनी पंतप्रधानपदाची तयारी जाहीर करणे म्हणजे स्वतःचा राजकीय आत्मघात करून घेण्यासारखे आहे. जर त्यांनी तसे उघडपणे म्हटले, तर ते पक्षात तरी टिकतील का? यावर मी 2029 मध्ये उत्तर देईन. पण जर कोणताही मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर बसत असेल, तर शिवसेना त्याला नक्कीच पाठिंबा देईल.' याचवेळी त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी यांचे उदाहरण देत, लोकप्रिय नेत्यांना दिल्लीत बोलावून फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कशी धोक्यात आणली जाऊ शकते, याकडेही लक्ष वेधले.

हेही वाचा – Yavatmal SUBT : ठाकरेंच्या दौऱ्याला 24 तासही उलटत नाहीत, तोच राजकीय भूकंप! 15 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना ठाकरेंनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'भाजपमध्ये नेहमी संघाच्या पसंतीचाच मुख्यमंत्री होत आला आहे, पण आता संघाची ती पकड राहिली आहे की नाही, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पक्षातील ही फोडाफोडी आणि गद्दारीचे राजकारण संघाला खरोखर मान्य आहे का?' तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात श्रीकांत शिंदे यांना स्थान मिळण्याच्या शक्यतेवर बोलताना, 'पात्रता नसतानाही आपल्या मुलाला मंत्रीपद मिळावे ही 'शहा सेना' आणि भाजपची अंतर्गत बाब आहे,' अशी सडकून टीका त्यांनी केली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number