मुंबई: वरळीत झालेल्या ‘विजयी मेळावा’ या कार्यक्रमामुळे संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्या या भेटीकडे राजकीय वर्तुळात मोठ्या आशेने पाहिलं जात आहे. अनेकांनी याचे स्वागत केलं असलं तरी काही विरोधकांनी मात्र यावर तीव्र टीका केली आहे. भाजप नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या कार्यक्रमावर खरमरीत शब्दांत टीका करत याला 'निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी' असं संबोधलं आहे.
शेलार यांनी आपल्या अधिकृत X (ट्विटर) खात्यावरून एक पोस्ट शेअर करत म्हणलं की, 'ही भाषेसाठी नव्हे तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी आहे.' त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हटले की, ज्या भावाला घराबाहेर काढलं, त्याच भावाची मनधरणी करण्यासाठी हा कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित केला गेला. शेलार यांचं सूचित करणं स्पष्ट होतं की, हे 'कौटुंबिक स्नेह मिलन' महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूनेच आयोजित केलं गेलं.
हेही वाचा:ठाकरे बंधूंना एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांनाही जमलं नाही, पण फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
ते पुढे म्हणाले, 'भाषेचं प्रेम वगैरे काही नाही, आणि ते यांच्या लेखी नाहीच. महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार करण्यासाठी ही केविलवाणी धडपड सुरू आहे.' शेलार यांनी जोरदार टोला लगावत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेला 'उबाठा सेना' असं संबोधत भाजपाला घाबरून आता भाऊबंदकी आठवली असल्याचं म्हटलं.
या टीकेच्या माध्यमातून शेलार यांनी संकेत दिले की, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंशी केलेली हातमिळवणी ही केवळ निवडणुकीत येणाऱ्या पराभवाची भीती असल्यामुळे केली गेली आहे. त्यांनी टोमणा मारत म्हटले, 'निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब ‘तहात’ जिंकण्याचा प्रयत्न.'
शेवटी, हा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार करतो, ठाकरे बंधूंची ही जवळीक कोणासाठी फायदेशीर ठरते आणि भाजप-शिवसेना संघर्ष आणखी किती वाढतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. पण विरोधकांनी सुरू केलेली टीका पाहता निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी राजकीय रणधुमाळीही अधिकच तीव्र होणार, हे निश्चित.