मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना एक मोठा धक्का बसला आहे. मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय कटारे यांच्यावरील अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील कोट्यवधीचा वाळूचा दंड कायम ठेवण्यात आला आहे. संजय कटारे यांना अवैध वाळू उत्खनन प्रकरणी 4 कोटी 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. गोदावरी नदीतून 2000 ब्रास अवैध वाळू उत्खनन प्रकरणात दंडाची रक्कम वसुलीचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कटारे यांना दंडातून वगळण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला होता, मात्र हा आदेश आता रद्द करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रातून 2000 ब्रास अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. 24 मार्च 2023 रोजी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या पंचनाम्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीची बाब समोर आली होती, ज्यात संजय काटारेंचे नाव होते. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कटारे यांना वगळणारा मागील आदेश रद्द करण्यात आला असून, गट क्रमांक 262 वरील 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा बोजा पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन तहसीलदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.