Balasaheb Sarvade Death: सोलापूर महापालिका निवडणुकीच्या काळात राजकीय वैमनस्यातून झालेल्या मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे यांच्यासह एकूण 6 जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. निवडणुकीच्या मैदानात असतानाच एखादा उमेदवार हत्येच्या आरोपाखाली गजाआड जाण्याची ही राज्याच्या राजकीय इतिहासातील दुर्मिळ घटना मानली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोलापूरमधील जोशी गल्ली येथे शुक्रवारी शिंदे आणि सरवदे या दोन गटांत तीव्र संघर्ष झाला होता. ही वादावादी इतकी विकोपाला गेली की, यात मनसेचे पदाधिकारी आणि युवासेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांना संपवण्यात आलं. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात एकूण 15 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप उमेदवाराला 2 दिवसांची कोठडी
दरम्यान, शनिवारी या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना प्रथम वर्ग न्यायदांडाधिकारी श्रीमती एम. पी. मर्ढेकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील तपासासाठी शालन शिंदे (भाजप उमेदवार) यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच आतिश, अमर आणि तानाजी शिंदे या तीन आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा – धक्कादायक! पत्नीकडून घेतली उधारी आणि शेवटी संपवलं स्वत:चं आयुष्य, त्याने नेमकं असं काय केलं?
महाविकास आघाडी आक्रमक; प्रणिती शिंदेंची भाजपवर घणाघाती टीका
या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली. या प्रकरणी निषेध म्हणून रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती बांधून आंदोलन करणार आहेत. प्रणिती शिंदेंनी या प्रकरणावर बोलताना सांगितलं की, सोलापूरच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम भाजपने केले आहे. केवळ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तेच्या माजातून रक्ताचे राजकारण सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. प्रशासनावर भाजपचा दबाव असल्याचा आरोप करत खासदार शिंदेंनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याची टीका केली. या घटनेमुळे सोलापूर महापालिका निवडणुकीला आता हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे.