मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतंच निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत जाहीर केली. यानंतर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. आरक्षणानुसार कुठल्या ठिकाणी कुठला उमेदवार द्यायचा, कुठली निवडणूक कशी लढायची? यासंदर्भात रणनीती आखायला सुरुवात केली असून महाविकास आघाडीसह महायुतीने देखील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भाजपाची उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती भाजपा मराठवाड्यात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: Agriculture Scheme 2025: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी क्षेत्रासाठी सुरू करणार 'या' खास योजना; लाखो शेतकऱ्यांना मिळणार फायदा
आगामी निवडणूक स्वबळावर लढायची की महायुती म्हणून लढायची यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शिवसेनेसोबत भाजपाचं थोडेफार जुळेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नकोच, असा सूर या बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांचा होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपापली बाजू मांडली.
महाराष्ट्रात सरकारला सकारात्मक वातावरण आहे का? या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांनी होकार दिला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्षाकडून झालेल्या त्रासाबद्दल सांगितले आणि स्वबळावर लढण्याची भूमिका अनेक जणांनी मांडली. बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्याचे लक्षात घेत भाजपा मराठवाड्यात वेगळी रणनीती आखू शकते, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. आठही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याचे सुचवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.